एमपीएल 2025 मध्ये बुधवारी (18 जून) दुपारपर्यंत 26 सामने खेळले गेले होते. साखळी फेरी समाप्त होण्यासाठी आता अवघे चार सामने शिल्लक आहेत. आतापर्यंत तीन संघांनी प्ले ऑफ्समधील आपली जागा निश्चित केली असून, एका जागेसाठी तीनही संघ दावेदार आहेत. मात्र, या एका जागेचे गणित कशाप्रकारे गुंतागुंतीचे आहे, याबाबत आपण जाणून घेऊया.
एमपीएल 2025 मध्ये 26 व्या सामन्यापर्यंत ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा व रायगड रॉयल्स यांनी प्ले ऑफ्समधील आपली जागा पक्की केली आहे. त्यापैकी ईगल नाशिक टायटन्स हे साखळी फेरी पहिल्या स्थानी संपवतील हे निश्चित झाले. तर, दुसऱ्या स्थानासाठी पुणेरी बाप्पा हे सर्वाधिक पुढे असल्याचे दिसते. तर, प्रथमच प्ले ऑफ्समध्ये दाखल झालेले रायगड रॉयल्स आपले अभियान दुसऱ्या क्रमांकावर संपवण्यासाठी प्रयत्नशील असतील. असे असताना अखेरच्या जागेसाठी मोठे झुंज होऊ शकते.
सातारा वॉरियर्स व कोल्हापूर टस्कर्स संघ अद्याप दोन सामने खेळणे बाकी आहे. स्पर्धेतील 27 वा सामना हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. कोल्हापूर संघाने हा सामना जिंकल्यास त्यांचे 9 गुण होतील. असे झाल्यास रत्नागिरी जेट्स व सातारा वॉरियर्स हे दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर होत कोल्हापूर प्ले ऑफ्समधील चौथा संघ बनेल. मात्र, सातारा संघाने विजय मिळवल्यास 7 गुणांसह ते पाचव्या क्रमांकावर दाखल होतील. पावसामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाल्यास, स्पर्धेतील रंगत आणखी वाढेल.
स्पर्धेत होणारा 28 वा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रायगड रॉयल्स असा होईल. सातारा वॉरियर्सविरूद्ध पराभूत होऊन अथवा एक घेऊन या सामन्यात कोल्हापूर संघ उतरल्यास त्यांना विजय अनिवार्य असेल. हा सामना जिंकून ते 9 किंवा 10 गुणांसह प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करतील. मात्र, पराभव झाल्यास त्यांच्या प्ले ऑफ्स आशांना मोठा धक्का बसेल.
पुणेरी बाप्पा विरुद्ध सातारा वॉरियर्स हा 29 वा सामना सातारा संघासाठी महत्त्वाचा असणारा आहे. कोल्हापूर नंतरच्या सामन्यातून 7 किंवा 6 गुणांसह ते या सामन्यात उतरतील. या सामन्यात पराभव झाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. तर, विजय मिळवल्यास व कोल्हापूरचे दोन्ही सामन्यात पराभव झाले असल्यास त्यांना प्ले ऑफ्स प्रवेशाची संधी असेल.
शेवटच्या साखळी सामन्यात ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स समोरासमोर असणार आहेत. या सामन्यातील विजय मिळवूनच रत्नागिरी जेट्स प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरू शकतात. मात्र, त्यासाठी कोल्हापूर व सातारा यांचे 8 किंवा त्यापेक्षा कमी गुण असणे आवश्यक आहे. अधिक मध्ये असलेली धावगती ही एकमेव गोष्ट सध्या रत्नागिरी जेट्सच्या बाजूने आहे.






