हॉकीविश्वात प्रो हॉकी लीग २०२५-२६ स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारत पुरूष हॉकी संघाचा गुरूवारी (१२ फेब्रुवारी) नजिकच्या काळातील मोठा पराभव झाला. राउरकेला येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग दुसरा पराभव होता. यामध्ये अर्जेटिनाने भारताला ८-० असे मोठ्या गोलच्या फरकाने पराभूत केले. अर्जेंटिनाकडून टॉमस डोमेने याने चार गोल केले.
डोमेनेने सामन्याच्या १५ व्या, २०व्या, २६व्या आणि ६०व्या मिनिटाला गोल केला. त्याचबरोबर टॉमस रुइज याने १४व्या मिनिटाला, लुसिओ मेंडज याने २२व्या मिनिटाला, इग्नासिओ इबारा याने २५व्या मिनिटाला आणि निकोलस डेला टोरे याने ३०व्या मिनिटाला गोल केले आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
भारताने सामन्याच्या सुरूवातील आघाडी घेण्याचा खूप प्रयत्न केला. काही मिनिटांमध्ये भारताचेच वर्चस्व होते आणि त्यांना पहिल्या सत्राच्या शेवटी गोल करण्याची संधी मिळाली, मात्र तो पेनल्टी स्ट्रोक वाया गेला. हरमनप्रीत सिंगच्या त्या प्रयत्नाला अर्जेंटिनाना गोलकीपरने अडवले. त्यानंतर लगेचच अर्जेंटिनाने गोल केला.
रुइजने संघाला गोल करत आघाडी मिळवून दिली. त्याने दुसरा गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. भारताने दुसऱ्या सत्राची सुरूवात चांगली केली होती. त्यामध्ये शिलानंद लाकरा आणि हरमनप्रीतला पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, मात्र ते त्याचे रुपांतर गोलमध्ये करू शकले नाही. हे भारताच्या चिंतेचे कारण बनले.
दुसऱ्या सत्रानंतर अर्जेंटिनाने त्यांचे वर्चस्व सुरू केले. डोमेनेने आणखी एक गोल करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. मेंडेजने लगेच चौथा गोल केला आणि सामना ४-० असा झाला. इबाराने पाचवा गोल केला आणि डोमेने यानेही त्याची हॅट्ट्रीक पूर्ण केली. पहिल्या ३० मिनिटांतच अर्जेंटिनाने ७-० अशी मोठी आघाडी घेतली. भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, मात्र एकदाही चेंडू गोल पोस्टमध्ये जात नव्हता.
या स्पर्धेत भारताचा पुढील सामना १४ फेब्रुवारीला बेल्जियमविरुद्ध आहे. बेल्जियमविरुद्ध भारताने पहिला सामना गमावला होता. तसेच १५ फेब्रुवारीला अर्जेंटिनाविरुद्ध आणि २१ फेब्रुवारीला स्पेन विरुद्ध सामने आहेत.




