आरसीबीचा माजी सलामीवीर तसंच न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज फिन एलननं (Finn Allen) 30 चेंडूत उत्तुंग 6 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 77 धावांची तुफानी खेळी करत खळबळ उडवून दिली. एलनच्या या विस्फोटक खेळीमुळे सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघानं सिएटल ऑर्कास संघाचा 6 गडी राखून पराभव केला आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) 2024च्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले.
तत्पूर्वी, कोरी अँडरसननं ( Corey Anderson) नाणेफेक जिंकून प्रथम सिएटल ऑर्कासला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात सिएटल ऑकर्स संघ 7 गडी गमावून 152 धावा करु शकला. ऑर्काससाठी यष्टीरक्षक क्विंटन डी काॅकनं 33 चेंडूत सर्वाधिक 62 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 8 चौकारांसह 3 उत्तुंग षटकार लगावले. तर शेहान जयसूर्या 31, शुभम रांजणे 26 आणि इमाद वसीमच्या 17 धावांच्या जोरावर सिएटल ऑकर्सनं फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससमोर 153 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससाठी हासन खाननं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कार्मी ले रोक्सनं 2 विकेट्स घेतल्या आणि कर्णधार कोरी अँडरसन 1 तर ब्रॉडी काउचनं 1 विकेट मिळवली.
सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससाठी 153 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फिन एलनं आणि मॅथ्यू शाॅर्ट यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मॅथ्यू शाॅर्ट 19 धावांवर बाद झाला परंतू फिन एलननं 30 चेंडूत 77 धावांची विस्फोटक खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 8 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 256.67 राहिला. एलन बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक जोश इंग्लिश 24 आणि शरफेन रुदरफोर्डच्या 17 धावांच्या खेळीनं सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सनं 6 गडी राखून सामना जिंकला.
सिएटल ऑर्काससाठी गोलंदाजी करताना हारमीत सिंगनं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर इमाद वसीम आणि कॅमेरॉन गॅनन 1-1 विकेट घेण्यात यशस्वी ठरले, परंतू सामना जिंकू शकले नाहीत. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार 77 धावांची तुफानी खेळी खेळलेल्या फिन एलनला देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिननं काढली आचरेकर सरांची आठवण, सोशल मीडियावर केली खास पोस्ट शेअर
‘या’ 5 दिग्गज खेळाडूंनी आपल्या देशासाठी कधीच नाही खेळला विश्वचषक…!
माजी क्रिकेटरला विश्वास, म्हणाले हे चार खेळाडू भरुन काढणार ‘रोहित-विराटची’ पोकळी