भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला.
सकाळी हलक्या रिमझिम पावसानंतर काही वेळानं मुसळधार पाऊस झाला. यामुळे ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पहिल्या दिवशीही पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला होता आणि 35 षटकांचा खेळ संपल्यानंतर पावसामुळे पुढील खेळ रद्द करावा लागला.
पावसामुळे कसोटीच्या संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याचं भारतात बऱ्याच वर्षांनी घडलं आहे. यापूर्वी 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात असं घडलं होतं. 2015 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. बंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधारानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेनं पहिल्या डावात 59 षटकांत सर्व गडी गमावून 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतानं 22 षटकात 80 धावा केल्या, मात्र त्यानंतर सामना अनिर्णित घोषित करावा लागला.
भारत विरुद्ध बांगलादेश कानपूर कसोटीबद्दल बोलायचं झालं तर, दुसऱ्या दिवशी 11:15 च्या सुमारास पाऊस थांबला तेव्हा मैदानावरील कर्मचाऱ्यांनी तीन सुपर सॉपर लावले. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ 2:15 वाजता रद्द करावा लागला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारीही पावसाची शक्यता आहे. परंतु सोमवारी आणि मंगळवारी आकाश निरभ्र राहिल. अशा स्थितीत सामना अनिर्णितेकडे वाटचाल करताना दिसत आहे.
कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 35 षटकांचा खेळ झाला, ज्यात बांगलादेशनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपनं सलामीवीर झाकीर हसन आणि शादमान इस्लामला बाद केलं, तर रविचंद्रन अश्विननं कर्णधार नझमुल हुसेन शांतोची विकेट घेतली. भारत पहिली कसोटी 280 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
हेही वाचा –
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत केन विल्यमसनच्या नावे नकोसा विक्रम! काय घडलं जाणून घ्या
कानपूर कसोटीला पावसानं झोडपलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द
मुशीर खानच्या अपघाताबाबत महत्त्वाचं अपडेट, हॉस्पिटलनं जारी केलं पहिलं स्टेटमेंट