मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९३ धावा केल्या आणि राजस्थानला १९४ धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने सुरुवातीच्या ३ विकेट्स १५ धावांच्या आतच गमावल्या. यामध्ये यशस्वी जैयस्वाल, स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनच्या विकेट्सचा समावेश होता. यशस्वी आणि सॅमसन शुन्यावर बाद झाले तर स्मिथला केवळ ६ धावा करता आल्या. यामुळे स्मिथने एक नकोसा विक्रमही केला आहे.
स्मिथची यंदा आयपीएलमध्ये एकेरी धावसंख्येवर सलग तिसऱ्यांदा बाद झाला आहे. याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध अबू धाबी येथेच ५ धावांवर बाद झाला होता. तर त्याआधी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दुबईमध्ये ३ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे स्मिथ त्याच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच सलग तीन डावात एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.
स्मिथने यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात चांगली केली होती. त्याने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात अर्धशतके केली होती. त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ६९ आणि किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध ५० धावा केल्या होत्या. पण नंतर तो सलग तीन सामन्यात एकेरी धावंसंख्येवर बाद झाला.
स्मिथ आत्तापर्यंत कारकिर्दीत ८६ आयपीएल सामने खेळला आहे.
स्मिथची आयपीएल २०२० मधील कामगिरी(६ ऑक्टोबरपर्यंत) –
६९ धावा – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (शारजाह)
५० धावा – विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (शारजाह)
३ धावा – विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (दुबई)
५ धावा – विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (अबू धाबी)
६ धावा – विरुद्ध मुंबई इंडियन्स (अबू धाबी)