आयपीएल 2024 चा 25 वा सामना गुरुवारी (11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. हा सामना हाय स्कोअरिंग होता. मात्र यजमान संघानं 27 चेंडू शिल्लक असताना सात विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं जरी हा सामना जिंकला असला तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं टी-20 क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम रचला आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावा केल्या. आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस (61), रजत पाटीदार (50) आणि दिनेश कार्तिक (53*) यांनी शानदार खेळी खेळली. मात्र त्याच डावात ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर आणि विजयकुमार वैशाख खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. टी-20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे की, एकाच संघातील तीन फलंदाजांनी अर्धशतक पूर्ण केलं आणि तीन फलंदाज खातं न उघडताच बाद झाले!
या सामन्यामध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली. आरसीबीचा डाव हा टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिला डाव ठरला, ज्यामध्ये तीन खेळाडूंनी अर्धशतकं ठोकली आणि एका गोलंदाजानं पाच बळी घेतले. आरसीबीकडून डू प्लेसिस, कार्तिक आणि पाटीदार यांनी अर्धशतकं झळकावली तर मुंबई इंडियन्सकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पाच बळी घेतले.
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात एकूण पाच फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. मुंबईकडून ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकं ठोकली. संपूर्ण सामन्यात एकूण पाच फलंदाजांनी अर्धशतकं ठोकण्याची आयपीएलमधील ही पाचवी वेळ आहे.
आयपीएल सामन्यामध्ये पाच जणांनी 50 पेक्षा अधिक स्कोअर करणे
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, शारजाह, 2020
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुबई, 2020
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, बंगळुरू, 2023
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2023
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, 2024
महत्त्वाची बातमी –
“नाहीतर मी कॅनडाकडून खेळण्याचा प्रयत्न केला असता”, जसप्रीत बुमराहचा धक्कादायक खुलासा
आरसीबीविरुद्ध 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज, जसप्रीत बुमराहनं मोडला 9 वर्ष जुना विक्रम
नाव मोठं, लक्षण खोटं! ‘बिग शो’ मॅक्सवेलचा आयपीएलमधील फ्लॉप शो जारीच