प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाची सुरुवात एकदम दिमाखदार झाली. चार नवीन संघ या मोसमात प्रो कबड्डीशी जोडले गेले आणि हा मोसम तीन महीने चालणार आहे. स्पर्धेच्या उदघाटनाचा सामना तमील थलाईवाज आणि तेलगू टायटन्स या संघामध्ये पार पडला. तेलुगू टायटन्सचा कर्णधार होता प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी खेळाडू राहुल चौधरी तर तमील संघाचा कर्णधार हा भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारा अजय ठाकूर.
२८ जुलै, शुक्रवार
प्रो कबड्डीच्या पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्स संघाने विजय मिळवला. त्यात राहुल चौधरीने उत्तम कामगिरी केली आणि पहिल्या सामन्यात सुपर टेन मिळवला. तेलगू टायटन्स संघात विशाल भारद्वाज या नवीन ऑलराऊंडर खेळाडूला संधी दिली होती. त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि सामन्यावर आपली छाप सोडली.
पहिल्याच दिवशी स्पर्धेचा दुसरा सामना प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी टीम यु मुंबा आणि पुणेरी पलटण या दोन्ही मजबूत संघात झाला. यात यु मुंबा संघाचे रेडर काही कमाल करू शकले नाहीत तर पुणेरी पलटणचा संघ रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही पातळ्यांवर उत्तम खेळला आणि सामना पुणेरी पलटण संघाने जिंकला. या सामन्यात दीपक निवास हुड्डा आणि संदीप नरवाल या पुणेरी पलटणच्या ऑलराऊंडर खेळाडूंनी संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली.
२९ जुलै,शनिवार.
दुसऱ्या दिवशी पाहिला सामना होता तो प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमाचा विजेता संघ जयपूर पिंक पॅन्थर आणि दबंग दिल्ली. जयपूरचा संघ मागील मोसमात उपविजेता संघ होता तर दिल्ली प्रो कबड्डीमध्ये कधीही सेमी फायनल पर्यंतचा पोहचू शकली नाही. जयपूचा संघ हा खेळाच्या सर्व पातळ्यांवर दिल्लीपेक्षा सरस संघ होता. कबड्डीला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात आणि त्याचे उदाहरण हा सामना बघून मिळाले. दबंग दिल्ली संघाने दुसऱ्या सत्रात पिछाडी भरून काढत आघाडी मिळवली आणि सामना जिंकला.
दुसऱ्या दिवशी दुसरा सामना झाला तो तेलुगू टायटन्स आणि पटणा पायरेट्स संघात. पटणाचा संघ मागील दोन्ही मोसमाचा विजेता संघ आहे. या वर्षी हा संघ थोडा कमकुवत वाटत असला तरी प्रदीप नरवाल हा नेहमी एकतर्फी सामना खेचून पटणा संघाला सामना जिंकून देऊ शकतो हे आपण प्रो कबड्डीमध्ये कित्येकदा पाहिले आहे. हा सामना देखील असाच झाला. या सामन्यात राहुल विरुद्ध प्रदीप असे समीकरण पहिल्या सत्रात जाणवत होते पण दुसऱ्या सत्रात पटणाच्या संघाने राहुलला ३-४ वेळा बाद केले आणि रेडींगमध्ये प्रदीपने गुण मिळवले. या मोसमातील पटणा संघाची कर्णधार म्हणून प्रदीपने जबाबदारी तर बजावलीच शिवाय त्यासोबत या सामन्यात रेडींगमध्ये १५ गुण देखील कमावले. त्याच्या ह्याच कामगिरीमुळे पटणा संघाने सामना जिंकला.
३० जुलै, रविवार
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पहिला सामना झाला यु मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स संघात. हरियाणा संघ प्रो कबड्डीचा पहिलाच सामना खेळणार होता आणि हा सामना जिंकून मोसमाच्या विजयी सुरवात करावी यासाठी ते नक्कीच उत्सुक होते. सामना सुरुवातीपासूनच अटातटीचा झाला. सामन्याचा निकाल हा शेवटच्या रेडपर्यंत ताणला गेला. या सामन्यात काशिलिंग अडकेने चांगली कामगिरी केली त्याला अनुपने सुरेख साथ दिली. हरियाणा संघासाठी वजीर सिंगने रेडींगमध्ये चांगली कामगिरी केली तर डिफेन्समध्ये कर्णधार सुरिंदर नाडाने उत्तम कामगिरी केली. शेवटच्या रेडमध्ये सामन्याचा निकाल निश्चित झाला. या सामन्यात यु मुंबाने एक गुणाच्या फरकाने जिंकला. मोसमातील सुरुवातीचे दोन्ही सामने हरण्याची नामुष्की यु मुंबा संघाने टाळली.
दुसरा सामना तेलगू टायटन्स आणि बेंगलुरु बुल्स या संघात झाला. रोहित कुमार विरुद्ध राहुल चौधरी असे या सामन्याचे चित्र पहायला मिळणार असे वाटत होते. राहुलने रेडींगमधील पहिला गुण मिळवत ५०० रेडींग गुणांचा आकडा गाठला. रोहितने या सामन्यात रेडींगमध्ये १० गुण मिळवले आणि सामन्यात तेलुगू टायटन्सचा संघ आघाडी घेणार नाही याची दक्षता घेतली. बुल्सच्या अजय कुमारने सामन्यात काही मिनिटे बाकी असताना सुपर रेड केली आणि सामन्याचा निकाल निश्चित केला. डिफेन्समध्ये रविंदर पहलने चांगली कामगिरी केली. बेंगलुरु बुल्स संघाने या मोसमाची सुरुवात विजयाने केली.