क्रीडापटू हे खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर एकतर त्याच क्षेत्रात काम करतात किंवा अन्य रस्ते निवडतात. जगातील ५ क्रिकेटपटू हे क्रिकेटमधील निवृत्तीनंतर वेगवेगळ्या देशांचे पंतप्रधान झाले. तर भारतात अनेक क्रिकेटपटू असेही झाले जे पुढे जाऊन खासदार किंवा आमदार झाले.
काही केंद्रिय मंत्रीही झाले. अगदीच उदाहरण घ्यायच झालं तर राजवर्धन सिंग राठोड हे ऑलिंपिंक्स पदक विजेते खेळाडू पुढे भारताचे क्रीडा मंत्री झाले होते. तसेच लालू प्रसाद यादव यांचा मुलगा क्रिकेटर तेजस्वी यादव पुढे बिहारचा उपमुख्यमंत्री झाला होता.
परंतु काही क्रीडापटू असेही झाले आहेत, जे पुढे जाऊन केवळ मंत्री किंवा आमदार न होता थेट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधी ना कधी क्रीडाक्षेत्रात नशीब आजमावले होते.
या लेखात आपण अशाच क्रीडापटूंची ओळख करुन घेणार आहोत, जे पुढे जाऊन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले.
मनोहर पर्रीकर (गोवा, फूटबाॅल)
१३ डिसेंबर १९५५ रोजी जन्म झालेल्या दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी ४ वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. गोवा हे राज्य संपूर्ण देशात फुटबॉल या खेळासाठी प्रसिद्ध आहे. मग त्याला मनोहर पर्रीकर हे कसे अपवाद असतील? पर्रीकर हे फुटबॉल खेळाचे मोठे चाहते होते. त्यांची फुटबॉल खेळतानाची छायाचित्रेही अनेक वेळा विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.
ते गोव्यात त्यांच्या शाळेकडून तसेच आयआयटी बाॅम्बेमध्ये फूटबाॅल खेळले होते. गोव्याच्या बजेटमध्ये त्यांनी क्रीडाक्षेत्रासाठी ३१४ कोटींची तरतूद केली होती. २०१२मध्ये त्यांनीच फूटबाॅल या खेळाला गोव्याचा राज्य खेळ म्हणून घोषीत केले होते.
२०१७मध्ये झालेल्या १७ वर्षाखालील फिफा विश्वचषकासाठी गोवा राज्यात काही सामने झाले होते. आजारी असतानाही फूटबाॅलप्रेमी पर्रीकरांनी फातोर्डा स्टेडियम नुतनीकरणासाठी सर्व मदत सरकारकडून केली होती. ते मुख्यमंत्री झाल्यावरही फूटबाॅलच्या अनेक संघटनांवर राहिले व या खेळाशी कायम जोडले गेले होते.
कॅप्टन अमरिंदर सिंग (पंजाब, पोलो)
पंजाब राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री भूषवित असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग हे पोलो खेळाचे मोठे चाहते आहेत. फावल्या वेळात ते पोलो खेळ खेळतात. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे वडील यादवीन्द्र सिंग यांनीही भारताकडून एक कसोटी सामना खेळला आहे. तर आजोबा भूपिंदर सिंग हे सुद्धा क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध होते.
एन. बिरेन सिंग (मनीपूर, फूटबाॅल)
२०१७मध्ये मणिपूरच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे एन. बिरेन सिंग हे एक फुटबॉलपटू, पत्रकार आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहे. फूटबाॅल खेळामुळेच त्यांची बीएसएफमध्ये निवड झाली होती. पुढे त्यांनी बीएसएफचा राजीनामा देऊन पत्रकारितेचे कोणतेही शिक्षण न घेता एक दैैनिक सुरु केले होते.
काही महिन्यांपुर्वीच बीएसएफ फूटबाॅल टीमकडून तत्कालीन राष्ट्रपतींबरोबर हस्तोलंदन करतानाच फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
एन. बिरेन सिंग हे देशांतर्गत फुटबॉल खेळले आहेत. ते तसेच फुटबॉल सामने पाहणे हा त्यांचा छंद आहे.