पुणे : महाराष्ट्रात १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वकरंडकाची तयारी चालू असताना, पुण्यात काल रविवार दि. १७ सप्टे. २०१७ रोजी वानवडी येथे समाजातील गरीब व वंचित मुलांना खेळण्याचा हक्क बजावता यावा या उद्देशातून ‘राईटटूप्ले’ मोहिमेअंतर्गत बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या पुढाकाराने रविवारी क्रीडा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या आधी फुटबॉल खेळण्याची संधी न मिळालेल्या समाजातील वंचित व दुर्बल घटकांतील मुलांनी फुटबॉल त्यांच्या ‘खेळण्याच्या हक्काचा’ पुरेपूर आनंद लुटला.
वानवडी येथील मोतीलाल मथुरावाला मैदान येथे संपन्न झालेल्या या क्रीडा उत्सवामध्ये ४०० मुले व त्यांचे समर्थक, संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. यातील अनेक मुलाना बाल हक्क आधारित काम करणाऱ्या पुण्यातील संस्थांमार्फत जसे यात तारा मोबाईल क्रेशेस मधील बांधकाम मजुरांची मुले, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत मधून कचरावेचकांची मुले, तसेच न्यू व्हिजन संस्थेमधील मुले अशांना ऑल इंडीया युथ फुटबॉल अकॅडमीद्वारा गेले ३ महिने प्रशिक्षण देण्यात आले होते. यात होप फॉर चिल्ड्रन इन नीड फौन्डेशन व तेरे देस् होम्स जर्मनी- इंडिया प्रोग्राम यांच्या पुढाकार होता. तसेच होप-वडगाव शेरी, माहेर-वढू अशा संस्थांचे संघ देखील सहभागी झाल्या होत्या. १७ वर्षांखालील ६ संघ, १४ वर्षांखालील ४ संघ यात सहभागी झाले होते.
मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक मा. मॅथ्यु सुसैनाथन, राष्ट्रीय पातळीवरील हॉकी खेळाडू एडविन जॉन, प्रदीप चौधरी- राज्य पातळीवरील खेळाडू, तसेच पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे प्रदीप परदेशी व इतर सदस्य, तसेच फुटबॉल खेळामधील मान्यवर तज्ञ उपस्थित होते. एआयवायएफएचे विवेक नागूल सर व त्यांच्या प्रशिक्षकाच्या सहकार्याने सर्व लढती उत्तम पार पडल्या.
यापूर्वी कधीही फुटबॉल न खेळलेल्या मुली आणि मुलांनी उत्तम प्रशिक्षण घेऊन भविष्यात उत्तम फुटबॉल खेळाडू बनण्याचे संकेत काल रंगलेल्या लढतीमधून दिले आहेत. विविध भागातून येऊन एकत्र खेळणे हा त्यांच्यासाठी नक्कीच एक वेगळा व अविस्मरणीय अनुभव होता.
“आम्हाला नवीन मित्र-मैत्रिणी भेटले, आमच्यात अनेकदा वाद झाले पण ते सोडवून खेळण्यासाठी आम्ही एकत्र आलो, टीम म्हणून खेळायला शिकलो आणि आम्हाला हे प्रशिक्षण अजून घ्यायचे आहे”, असे संजना व अनिता या फूटबॉल टीम मधील मुलीनी सांगितले.
हा उत्सव ‘राईट टू प्ले’ या बालहक्कांवर काम करणाऱ्या पुण्यातील स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व होप फॉर चिल्ड्रन इन नीड फौन्डेशन व न्यू व्हिजन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.