महिला टी२० वर्ल्डकप: टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले असे

आजपासून (21 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया येथे महिला टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या विश्वचषकातील पहिला सामना भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात सिडनी येथे सुरु आहे. हा महिला टी20 विश्वचषकाचा 7 वा हंगाम आहे.

या 7 व्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघ पहिल्यांदाच माजी कर्णधार मिताली राजशिवाय खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. याआधी झालेल्या सर्व 6 महिला टी20 विश्वचषकात मिताली भारतीय संघाचा भाग होती.

तिने आत्तापर्यंत 2009, 2010, 2012, 2014, 2016 आणि 2018 असे 6 टी20 विश्वचषक खेळले आहेत. हे विश्वचषक खेळताना तिने 24 सामन्यात 40.33 च्या सरासरीने 726 धावा केल्या आहेत. तसेच तिने 2012, 2014 आणि 2016 या तीन महिला टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे.

मात्र तिने मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2021 मध्ये न्यूझीलंडला होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने टी20 मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे यावर्षी भारतीय महिला संघ पहिल्यांदाच तिच्याशिवाय टी20 विश्वचषकात खेळत आहे.

यावर्षीच्या विश्वचषकात हरमनप्रीत कौर भारताने नेतृत्व करत आहे. तसेच भारतीय संघात स्म्रीती मंधना, वेदा कृष्णमुर्ती, दिप्ती शर्मा, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड अशा काही अनुभवी खेळाडू आहेत. त्याचबरोबर शेफाली वर्मा, जेमिमाह रोड्रीगेज या युवा खेळाडू आहेत.

आज या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 132 धावा केल्या आहेत. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक नाबाद 49 धावा केल्या. तसेच 16 वर्षीय शेफाली वर्माने 15 चेंडूत आक्रमक फटकेबाजी करत 29 धावा केल्या. तर रोड्रीगेजने 26 धावांची खेळी केली.

You might also like