ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार ऍने गॉर्डन या आज (२४ डिसेंबर) आपला ७९वा वाढदिवस साजरा करत आहेत. डोरोथी ऍने गॉर्डन यांचा जन्म २४ डिसेंबर १९४१ ला व्हिक्टोरिया येथे झाला होता. व्हिक्टोरियाच्या गिप्सलँड येथील मो शहरात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. कुणीही विचार केला नव्हता की, ही मुलगी पुढे जाऊन इतिहास घडवेल.
गॉर्डन या महिला विश्वचषक सामन्यादरम्यान ३ झेल घेणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटपटू आहेत. या शानदार विक्रमासाठी आजही त्यांची प्रशंसा केली जाते.
एवढेच नव्हे तर, गॉर्डन या पहिल्या महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधार होत्या. १९७३ साली महिला विश्वचषकाची सुरुवात झाली होती.
लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला क्रिकेट सामन्याच्या साक्षीदार
याबरोबरच गॉर्डन या ‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर झालेल्या पहिल्या महिला क्रिकेट सामन्याच्याही साक्षीदार आहेत. १९७६ साली ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तिथे दोन्ही संघांदरम्यान ३ सामन्यांची वनडे मालिका झाली होती. या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स येथे खेळवण्यात आला होता.
४ ऑगस्ट १९७६ रोजी झालेल्या या ऐतिहासिक सामन्यात गॉर्डन यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्वपद सांभाळले होते. दुर्दैवाने ऑस्ट्रेलिया संघ तो सामना जिंकू शकला नाही. इंग्लंडने २२ चेंडू राखून ८ विकेट्सने तो सामना जिंकला होता.
गॉर्डन यांची क्रिकेट कारकिर्द
डिसेंबर १९६८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून गॉर्डन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी त्यांना ५ वर्षे वाट पाहावी लागली होती. आपल्या ८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत गॉर्डन यांनी ९ कसोटी आणि ८ वनडे सामने खेळले होते.
कसोटी कारकिर्दीत ५७ धावांवर ५ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीसह त्यांनी एकूण २२ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ३८ धावांच्या सर्वोच्च खेळीसह त्यांनी १९५ धावा केल्या होत्या. वनडेतही त्यांनी ७ विकेट्स आणि ९९ धावांची कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त २१ सामन्यात त्यांनी व्हिक्टोरिया क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे.
Happy birthday to former Australia captain Anne Gordon 🍰 #DidYouKnow she was the first woman to take three catches in a @cricketworldcup match 👏 pic.twitter.com/mwZYjmDcrv
— ICC (@ICC) December 24, 2020
निवृत्तीनंतरच्या पदव्या
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर व्हिक्टोरिया महिला क्रिकेट असोसिएशच्या निवडकर्ता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच इंग्लंड आणि सर्रे महिला क्रिकेट संघाच्याही त्या निवडकर्ता राहिल्या आहेत. विशेष म्हणजे, २०१८ साली गॉर्डन यांना क्रिकेट व्हिक्टोरियाचे आजीवन सदस्यत्व देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीसाठी असा असणार ऑस्ट्रेलियाचा ११ जणांचा संघ
आनंद गगनात मावेना! क्रिकेट पाहताना चिमुकल्यांचा उत्साह कॅमेऱ्यात कैद, फोटो तुफान व्हायरल
व्हिडिओ : राशिद खानच्या केवळ ४ चेंडूवर ‘या’ गोलंदाजाने फटकाविल्या तब्बल १५ धावा