जगभरात असे अनेक खेळाडू आहेत, जे आपल्या विस्फोटक फलंदाजीने टी20 क्रिकेटवर राज्य करतात. यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे. सूर्या सध्या आयसीसी टी20 क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. सूर्या मैदानातील प्रत्येक कोपऱ्यात आपल्या फटकेबाजीने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पोहोचवण्यात पटाईत आहे. त्यामुळे त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखला जाणाऱ्या एबी डिविलियर्स याच्यासोबत केली जाते. मात्र, सूर्याने स्पष्ट केले आहे की, ‘360 डिग्री’ खेळाडू फक्त एकच आहे आणि तो म्हणजे डिविलियर्स. त्यामुळे त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही. असे असले, तरीही एबी डिविलियर्सने सूर्याचं कौतुक केले आहे.
काय म्हणाला एबी डिविलियर्स?
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने जिओ सिनेमाशी बोलताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचं कौतुक केलं. तो म्हणाला की, “हे अविश्वसनीय आहे. मला वाटते की, तो असे शॉट मारत आहे, जे मी कधीच मारले नाहीत. त्याची फलंदाजी पाहणे मला आवडत आहे. जेव्हा तो लयीत असतो, तेव्हा त्याला खेळताना पाहणे चांगले वाटते.”
दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गजाला विश्वास आहे की, “सूर्याला त्याच्या क्रिकेट प्रवासात अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि अजून खूप शक्यता आहे. तो भविष्यात आणखी चांगला खेळाडू बनेल.” त्याने असेही म्हटले की, तो सूर्या आणि स्वत:मध्ये बऱ्याच समानता पाहतो. पुढे बोलताना डिविलियर्स म्हणाला की, “सूर्यकुमारकडे फलंदाजीवेळी सहजरीत्या गिअर बदलण्याची क्षमता आहे. ही क्षमता त्याला शानदार फलंदाजांच्या श्रेणीत बसवते. क्रीझवरील त्याचा दृष्टीकोन हाच त्याच्या यशामागील कारण आहे.”
“जेव्हा तो आत्मविश्वासाने भरलेला असतो, तेव्हा सावकाश सुरुवात करून आपली खेळी खूप पुढे नेतो. तो चेंडूला उशिरा खेळतो. एकदा तो फलंदाजाच्या रूपात जेव्हा गोलंदाजाला ओळखतो, तेव्हा कोणताही गोलंदाज जितक्या वेगाने चेंडू टाकतो, तुम्ही तितक्या वेगाने त्या चेंडूला योग्य वेळेत मारण्यात यशस्वी होता. आकाशच त्याची मर्यादा आहे,” असे डिविलियर्स म्हणाला.
त्याने पुढे असेही म्हटले की, “सूर्यापुढे सर्वात मोठे आव्हान खेळाच्या सर्व क्रिकेट प्रकारात सातत्य कायम राखणे असेल. त्याला कसोटी, वनडे आणि टी20 क्रिकेटसाठी आपला खेळ समजून घ्यावा लागेल की, हे त्याच्यासाठी कशाप्रकारे काम करते.”
सूर्याची कारकीर्द
सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत 1 कसोटी सामना, 23 वनडे सामने आणि 48 टी20 सामने खेळले आहेत. एकमेव कसोटीने सूर्याने फक्त 8 धावा केल्या होत्या. वनडेत त्याच्या नावावर 24.05च्या सरासरीने 433 धावा आणि टी20त 46.52च्या सरासरीने 1675 धावांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्याने 3 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली आहेत. एवढंच नाही, तर क्रिकेट प्रकारात त्याचा स्ट्राईक रेट हा 175.76 इतका आहे. (former cricketer ab de villiers praised suryakumar yadav for his batting abilty)
महत्वाच्या बातम्या-
उद्ध्वस्त होत असलेल्या विंडीजला वाचवण्यासाठी धावून आला ब्रायन लारा, भारताविरुद्धच्या मालिकेत मोठी जबाबदारी
ब्रेकिंग! पुरुषांच्या इमर्जिंग Asia Cup 2023साठी भारतीय संघाची निवड, नेतृत्वाची धुरा ‘या’ पठ्ठ्याकडे