भारतीय संघाचा विस्फोटक विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी जगभरातील भल्याभल्या गोलंदाजांची झोप उडवली आहे. विराटची धावांची भूक चांगलीच वाढत चालली आहे. याची झलक आशिया चषक 2023 स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याने स्वत:ला शानदार पद्धतीने फिट ठेवले आहे. त्यामुळेच सध्या तरी विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाहीये. असे असले, तरीही विराटचा खास मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स याने विराटला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्तीची वेळ सांगितली आहे.
केव्हा घेतली पाहिजे निवृत्ती?
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना विराट कोहली (Virat Kohli) याच्या निवृत्तीविषयी भाष्य केले. डिविलियर्स म्हणाला, “मला माहितीये की, त्याला दक्षिण आफ्रिकेला यायला आवडते, पण हे म्हणणे खूप कठीण आहे. यासाठी अजून बराच वेळ आहे. मला वाटते की, हे तुम्हाला विराट कोहलीच चांगल्याप्रकारे सांगू शकेल. मला वाटते, जर भारत विश्वचषक जिंकण्यात यशस्वी झाला, तर विराट कोहलीसाठी निवृत्ती घेण्याची ही खराब वेळ नसेल. त्याने म्हटले पाहिजे की, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आता मी आगामी काही वर्षे फक्त कसोटी क्रिकेट आणि थोडेफार आयपीएल खेळेल. तसेच, आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्याचा आनंद घेईल.”
विश्वचषक जिंकणे विराटची इच्छा
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या 49 शतकांचा विक्रम मोडण्याच्या खूपच जवळ पोहोचला आहे. मात्र, डिविलियर्सला वाटते की, विराटची इच्छा कोणताही विक्रम मोडणे नाही, तर भारतासाठी विश्वचषक जिंकणे आहे. तो म्हणाला, “मला वाटत नाही की, त्याचे लक्ष यावर (सचिनच्या विक्रमावर) आहे. तो फक्त आपल्याबाबत विचार करणारा व्यक्ती आहे. विराटला संघासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. तसेच, त्याला सर्व क्रिकेट प्रकारातील दमदार संघाचा भाग बनायचे आहे. तो एक संघ खेळाडू आहे, जे तुम्ही मैदानावरील त्याच्या भावना पाहून समजू शकता.”
विराट कोहली चौथ्या विश्वचषकाचा भाग
भारतीय संघासाठी वनडेत 280 सामन्यात 13 हजारांहून अधिक धावा करणारा विराट कोहली चौथा वनडे विश्वचषक खेळताना दिसेल. विराटने 2011 साली पहिला विश्वचषक खेळला होता. हा विश्वचषक भारताने एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्यानंतर विराट 2015 आणि 2019च्या विश्वचषकातही खेळला होता. मात्र, दोन्ही विश्वचषक जिंकण्यात भारत अपयशी ठरला होता. अशात विराट कोहली विश्वचषक 2023 (World Cup 2023) खेळताना दिसेल. विराटसोबतच 140 कोटी भारतीयांची हा विश्वचषक जिंकण्याची इच्छा आहे. (former cricketer ab devilliers tells when virat kohli should announce retirement from white ball cricket)
महत्त्वाच्या बातम्या-
न भूतो…! धोनी-कोहलीसारख्या भल्याभल्या कर्णधारांना न जमलेला पराक्रम हरमनप्रीतने केला, बनली दिग्गज Captain
लॅबुशेनचा त्रिफळा उडवणारा अश्विनचा ‘तो’ चेंडू चर्चेत कशामुळे? फिरकीपटूने स्वतः सांगितली रणनीती