सध्या सुरू असलेला 2025चा आयपीएल हंगाम आता अंतिम टप्प्याकडे चालला आहे. पण यंदाच्या हंगामात चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव सुरूच आहे. अलिकडेच त्यांना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. यावर माजी भारतीय फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) म्हणाला की, आता चेन्नई टी20 क्रिकेटच्या बदलत्या शैलीशी जुळवून घेण्याबाबत अधिक सावधगिरी बाळगेल. एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईने त्यांच्या संघात काही बदल केले पण तरीही त्यांना विजय मिळाला नाही. संघ गुणतालिकेत तळाशी दहाव्या स्थानावर राहिला.
अंबाती रायुडू जिओहाॅटस्टारवर बोलताना म्हणाला की, “मी सहमत आहे की हा सीएसकेसाठी सर्वात वाईट काळ आहे, परंतु शिकण्याची ही एक चांगली संधी देखील आहे. जर तुम्ही तुमच्या मागील यशावर टिकून राहिलात आणि भविष्यासाठी तयारी केली नाही तर हे परिणाम होतील. आता सीएसके भविष्यासाठी खूप काळजीपूर्वक योजना आखेल. एमएस धोनीने देखील कबूल केले आहे की खेळ खूप बदलला आहे आणि मला खात्री आहे की त्यांनी पुढील संघासाठी तयारी सुरू केली आहे.”
पुढे बोलताना रायुडू म्हणाला, “फलंदाजीत काही चांगले संकेत दिसले आहेत. जसे की डेवाल्ड ब्रेविस आणि आयुष म्हात्रे यांच्या कामगिरीमुळे. कधीकधी असे कठीण हंगाम संघाला जमिनीवर आणतात आणि तुम्हाला आठवण करून देतात की क्रिकेट ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला मूलभूत गोष्टींवर टिकून राहण्याची आणि नम्र राहण्याची आवश्यकता आहे.”
शेवटी रायुडू म्हणाला, “मला वाटत नाही की फलंदाज शॉट निवडीमध्ये गोंधळलेले आहेत, उलट ते आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेत आहेत आणि पुरेसे शॉट खेळत नाहीत. संघात बदल आवश्यक होते आणि आपण आता जे पाहत आहोत ते कदाचित पुढील हंगामाच्या तयारीचा एक भाग असेल. माझ्या मते, सीएसके त्यांच्या सध्याच्या संघातील बहुतेक खेळाडूंना ठेवू शकणार नाही. जेमतेम 7-8 खेळाडूंना कायम ठेवले जाईल.”





