कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्मशी झगडत असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या क्रिकेट पंडितांच्या निशाण्यावर आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डॅरिल कलिनननं रोहितवर हल्ला चढवला. कलिनननं रोहितच्या फिटनेसवर टीका करत त्याचं वजन जास्त असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यानं रोहितवर सपाट खेळपट्ट्यांवर खेळणारा क्रिकेटर अशीही टीका केली.
रोहित शर्मा गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये धावा करत नाहीये. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर फ्लॉप ठरल्यानंतर रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीतही अपयशी ठरला. या कसोटीत तो 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र याचा टीमला आणि त्याला देखील काही फायदा झाला नाही.
डॅरिल कलिनननं रोहित मोठ्या कसोटी मालिकांसाठी फिट नसल्याचं म्हटलं आहे. कलिनन म्हणाला, “तुम्ही रोहितला पाहा आणि विराटला पाहा. त्यांच्या फिटनेसमधील अंतर पाहा. रोहितचं वजन जास्त आहे. तो दीर्घकाळ खेळणारा क्रिकेटपटू नाही. रोहित चार किंवा पाच कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी फिट नाही.”
रोहित शर्मानं मार्च 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर आतापर्यंत कसोटीत केवळ एकच अर्धशतक झळकावलं आहे. तो या फॉरमॅटमध्ये गेल्या 12 पैकी 8 डावांमध्ये दुहेरी आकडा देखील गाठू शकलेला नाही. रोहितच्या खराब फॉर्मचा परिणाम त्याच्या कसोटी रँकिंगवर देखील झाला आहे. तो 6 वर्षांनंतर टॉप 30 मधून बाहेर पडला. फलंदाजांच्या ताज्या कसोटी रँकिंगमध्ये रोहित शर्मा सध्या 31व्या क्रमांकावर आहे.
बॉर्डर-गावस्कर मालिकेचा तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. या सामन्यात रोहित शर्मा सलामीला उतरण्याची शक्यता आहे. रोहित सलामीला आल्यास केएल राहुल मधल्या फळीत खेळू शकतो.
हेही वाचा –
ॲडलेडमधील फ्लॉप शोनंतर रोहित शर्मा पुन्हा बदलणार बॅटिंग ऑर्डर, केएल राहुलचं काय होणार?
गाबामध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा घमंड तुटणार? मॅथ्यू हेडनचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला
शॉ, रहाणे आणि दुबेची आक्रमक खेळी, टी20 क्रिकेटमध्ये मुंबई संघाने रचला इतिहास






