सध्या भारतात ऐनकेन गोष्टींवरून वातावरण तापतेय. मीडियातून अनेक बातम्या येत आहेत आणि लोक त्या वाचून पाहून प्रतिक्रिया देतायेत. अशातच, भारतीय क्रिकेट आणि भारतीय राजकारण या दोन्ही गोष्टी ढवळून काढणारी बातमी १९ मे च्या भर दुपारी आलीये. इंडियन क्रिकेट टीमचे माजी ओपनर आणि सध्या काँग्रेसचे ताकदवर नेते असलेले नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुप्रीम कोर्टाने सुनावली. प्रकरण आहे ३४ वर्ष जुने. आपल्याकडे म्हणतात ना ‘भगवान के घर देत है अंधेर नही’ अगदी तसेच घडलंय. तब्बल साडेतीन दशक जुन्या प्रकरणाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिलाय आणि एका बड्या आसामीला आता त्यामुळे किमान एक वर्ष गजाआड राहावेच लागणार आहे, पण सिद्धू यांनी केलेला हा गुन्हा काय होता आहे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर हा लेख नक्की वाचा, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि या संपूर्ण घटनाक्रमाची उकल होऊन जाईल.
डोमेस्टिक क्रिकेट गाजवून पंजाबच्या एका बड्या फॅमिलीतून आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी, १९८३ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला. पहिल्याच सिरीजला वेस्ट इंडिजविरुद्ध सिद्धू पुरते फ्लॉप गेले. संघातली जागा गेली. कोणी म्हटलं वशिल्याचा तट्टू, तर कोणी म्हटलं स्ट्रोकलेस प्लेयर. सिद्धू हार मानणाऱ्यातील नव्हते. पुन्हा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गेले आणि तीन वर्षानंतर संघात आले ते परफेक्ट वनडे बॅटर बनूनच. १९८७ वर्ल्डकपनंतर खऱ्या अर्थाने फेमस झालते. पुढे येऊन येऊन छक्के मारण्याची त्यांची स्टाईल त्यांना अलग बनवत होती. टीम इंडियात ओपनिंगची जागा त्यांच्या नावे झालेली. इंटरनॅशनल क्रिकेटरचा औरा असला तरी, सिद्धू म्हणजे एकदम मस्त मौला आदमी. मित्र घ्यायचे, फिरायला जायचं, मजामस्ती करायची. अस्सल पंजाबी हॅपी गो लकी पर्सनॅलिटी. टीम इंडियाच्या मॅच नव्हत्या म्हणून सिद्धू आपल्या घरी होते. तारीख होती २७ डिसेंबर १९८८. सिद्धू पतियाळात एका मित्राला भेटायला निघालेले. त्यांची जिप्सी ते स्वतःच चालवत होते. सिग्नल लागला म्हणून सभ्य माणसाप्रमाणे त्यांनी आपली गाडी थांबवली. सिग्नल सुटला आणि बाकी गाड्या पुढे गेल्या. मात्र, सिद्धू यांची गाडी तिथेच थांबली ती पुढे गेली नाही. दोन मिनिटे मागचे हॉर्न देऊन कंटाळले आणि नंतर गाडीतून उतरून सरळ सिद्धू यांच्यापर्यंत आले.
हेही पाहा- नक्की कोणत्या प्रकरणामुळे नवज्योतसिंग सिद्धू जाणार तुरुंगात
मागच्या गाडीतील तो व्यक्ती होता गुरुनाम सिंग. शब्दाने शब्द वाढला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. भर सिग्नलवर एक इंडियन क्रिकेटर एका व्यक्तीला मारत होता. सिद्धू म्हणजे थोडा यमला पगलाच. गुरुनाम सिंगला मारहाण केली आणि त्याला तसाच सोडून त्यांनी आपली जिप्सी पळवली. लोकांनी गुरुनामला हॉस्पिटलमध्ये नेले, पण तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी चौकशी केली आणि या प्रकरणात नाव आले नवज्योत सिंग सिद्धू यांचे. पोलीस शोध घेऊ लागले. मात्र सिद्धू पाच-सहा दिवस गायब राहिले. शेवटी पोलिसांना टीप लागलीच आणि त्यांनी सिद्धूंना अटक केली. एका करंट इंडियन क्रिकेटरवर कलम लागले ३०२. सदोष मनुष्यवधाचे.
प्रकरण कोर्टात गेले आणि सिद्धूंना तात्पुरता जामीन मिळाला. सिद्धू पुन्हा टीम इंडियासाठी खेळू लागले. दरम्यानच्या काळात कोर्टाच्या तारखाही होत्याच. अखेर १९९९ साल उजाडलं. सिद्धू रिटायरमेंटच्या जवळ आलेले. खरंतर रिटायरटरमेंटची फक्त घोषणा बाकी होती. अशात गुरुनाम सिंग मर्डर केसचा निकाल पटियाला सेशन कोर्टाने सिद्धूंच्या बाजूने दिला. गुरनाम याचा मृत्यू मारहाणीतून झाला, पण हे दोघे एकमेकांना ओळखत नव्हते, आणि त्याचा जीव घेण्याच कोणतेही ठोस कारण सिद्धू यांच्याकडे नव्हतं, असे कोर्टाने म्हटले आणि त्यांना निर्दोष मुक्त केले.
हा सिद्धूंना फक्त दिलासा होता. कारण, २००२ ला पंजाब सरकारनेच त्या पहिल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेत घेतली. निकाल लागायला चार वर्षे लागली. मधल्या काळात २००४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत सिद्धू खासदार झाले. २००६ मध्ये जो निकाल लागला त्यात सिद्धूंना गिल्टी मानून तीन वर्षांची शिक्षा सुनावली गेली. खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. ११ जानेवारीला सिद्धू जेलमध्ये गेले आणि १२ जानेवारीला जामिनावर सुटले. कारण, कोर्टात त्यांची बाजू मांडली ती भाजप नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ अरुण जेटली यांनी. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी केली आणि हायकोर्टाच्या निकालाला स्टे दिला. सिद्धू पोटनिवडणुकीत उभे राहिले आणि निवडूनही आले. ही हाय प्रोफाईल केस आता सुप्रीम कोर्टात होती. जवळपास बारा वर्षाचा काळ लोटला. सिद्धू भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले. अखेर २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल देत त्यांना निर्दोष म्हटले आणि मारहाणीबद्दल एक लाखाचा दंड भरला. गुरुनाम यांच्या मुलाने पुन्हा याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली.
काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धूंचा शब्द चालत होता. २०२२ला सिद्धू मुख्यमंत्री होणार असे म्हटले जाऊ लागले, पण ऐनवेळी चरणजीत चन्नींचा नंबर लागला. पुढे निवडणुकीतही सिद्धू फारसे ऍक्टिव्ह दिसले नाहीत. कधीकाळी लाफ्टर शोमध्ये ज्या भगवंत मान पुढे ते जज म्हणून होते, तेच भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री झाले. सिद्धूंची ग्रह दशा फिरली. आता सुप्रीम कोर्टाने आपला निकाल बदललाय. सिद्धूंना एक वर्ष जेलमध्ये काढावेच लागणार. शरण आले तर ठीक, नाहीतर पोलीस त्यांना उचलणार. क्रिकेट, राजकारण, कॉमेंट्री, कॉमेडी या साऱ्याच क्षेत्रांवर हुकूमत गाजवणाऱ्या सिद्धूंच्या या प्रकरणानंतर, त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, “गुरु मेला लुट गया है.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुर्दैवी! असा मृत्यू कोणाचाही होऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूंना अपघातात गमवावा लागलाय जीव
काही कळायच्या आत डॅनीने करिष्माला उचलून घेतले, अन् ‘ते’ कांड झाले, जाणून घ्याच