नवी दिल्ली| इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज ग्रॅहम ओनियन्सने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीस बॉब विलिस ट्रॉफीदरम्यान त्याला दुखापत झाली होती, त्यानंतर पाठीला दुखापत झाल्याने त्याने आपली व्यावसायिक क्रिकेट कारकीर्द संपविण्याचा निर्णय घेतला आहे. तो इंग्लंडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये लँकशायर संघाकडून खेळत होता.
उल्लेखनीय आहे की ग्रॅहम ओनियन्स इंग्लंडकडून 2009 ते 2012 पर्यंत नऊ कसोटी सामन्यांमध्ये खेळला होता आणि या काळात त्याने 29.90 च्या सरासरीने 32 बळी घेतले. त्याने इंग्लंडकडून 4 वनडे सामने खेळले आणि 4 बळी घेतले. एकदा संघातून बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा परत येऊ शकला नाही.
आतापर्यंत 874 बळी घेतले आहेत
2009 ला वेस्ट इंडीजविरुद्धच्या पदार्पण सामन्यात त्याने 5 बळी घेतले आणि लॉर्ड्स ऑनर्स बोर्डमध्ये नाव नोंदवले होते. त्याचवेळी 2009 ऍशेस मालिकेतील पाचपैकी तीन कसोटी सामन्यांमध्ये तो खेळला. आपल्या 16 वर्षांच्या कारकीर्दीत त्याने 874 बळी घेतले आहेत.
ग्रॅहम आपल्या निवृत्तीबद्दल काय बोलला ते जाणून घ्या
निवृत्तीबाबत ग्रॅहम ओनियन्स म्हणाला की, “मला हा खेळ सोडण्याची इच्छा नव्हती. परंतु मला वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल आणि हे मान्य करावे लागेल की मी हे माझे आरोग्य आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी करीत आहे. मी सर्वकाही पूर्णपणे दिले आणि मला ते कोणतेही खेद न करता पूर्ण करता आले. ऍशेस-विजेत्या इंग्लंड संघाचा भाग होण्यापासून ते डरहम येथे प्रथम श्रेणी बळी घेण्यासाठी अग्रगण्य गोलंदाज होण्यापर्यंत मी जे काही स्वप्न पाहिले त्याहूनही जास्त मिळवले.”
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही विक्रम प्रभावी ठरला आहे
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचा विक्रम खूपच प्रभावी आहे. डरहमकडून खेळत त्याने लॉर्ड्समधील 2007 च्या फ्रेंड्स प्रोव्हिडंट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजयासह प्रथम मोठा करंडक जिंकला. त्याने डरहमकडून खेळताना 527 बळी घेतले आणि या संघाचा सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला.
त्यानंतर 2017 मध्ये तो लँकशायरला गेला. लँकशायरकडून खेळताना त्याने 23 सामन्यांत 104 गडी बाद केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 192 सामन्यांत 25.70 च्या सरासरीने व 3.33 च्या इकॉनोमीसह एकूण 723 बळी घेतले . त्याचबरोबर त्याने अ दर्जाच्या 99 सामन्यांत 113 बळी घेतले आहेत. ग्रॅहम ओनियन्सने 47 टी -20 सामने खेळले आणि 38 गडी बाद केले.