क्रिकेटमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडची माजी यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलर हिने बुधवारी (दि. 22 फेब्रुवारी) जगासमोर मोठी घोषणा केली. सारा टेलर हिने पार्टनर प्रेग्नंट असल्याची माहिती चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली. 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या साराने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली. यासोबत तिने एक फोटोही शेअर केला आहे. तसेच, तिने हा प्रवास सोपा नव्हता, पण याचा भाग बनून चांगले वाटत असल्याचा खुलासा तिने केला.
सारा टेलर पार्टनर प्रेग्नंट (Sarah Taylore Partner Pregnant) असल्याचे सांगताना ट्वीट करत म्हणाली की, “आई बनणे हे कायमच माझ्या पार्टनरचे स्वप्न राहिले आहे. हा प्रवास सोपा नाहीये, पण डायनाने कधीही हार मानली नाही. मला माहिती आहे की, ती सर्वात चांगली आई बनेल. तसेच, याचा भाग बनून मी खूप खुश आहे. 19 आठवड्यांनंतर आयुष्य खूप वेगळे असेल.”
साराची निवृत्ती
सारा टेलर (Sarah Taylor) ही महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आणि सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. तिने चिंतेचे कारण देत सप्टेंबर 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. तिने मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या कारणामुळे मार्च 2016मध्ये खेळातून अनिश्चित काळासाठी ब्रेकही घेतला होता. मात्र, नंतर तिने विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुनरागमनही केले होते.
सन 2017मध्ये विश्वचषकात पुनरागमन करत तिने 49.50च्या सरासरीने 396 धावा चोपल्या होत्या. टेलरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका गट सामन्यात 147 धावांचा पाऊस पाडला होता. तसेच, उपांत्य सामन्यात 54 आणि भारताविरुद्ध 45 धावांची खेळी साकारली होती. टेलर ही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडची सर्वाधिक धावा करणारी दुसरी आणि एकूण सातवी खेळाडू आहे. तिने 90 सामन्यात 29.02च्या सरासरीने 2177 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना तिने 16 अर्धशतकेही केली आहेत. तिने 10 कसोटी सामन्यात 300 धावांचे योगदान देत इंग्लंडचे प्रतिनिधित्वही केले होते. (former england cricketer sarah taylor announce pregnancy of her partner read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बला’त्काराच्या आरोपाखाली क्रिकेटरने खाल्ली जेलची हवा, पण जामीन मिळताच कमबॅक करत फलंदाजांचा काढला घाम
आयपीएलप्रेमींवर अंबानी मेहरबान! आता फुकटात पाहता येतील सर्व सामने, खर्च केलेत ‘एवढे’ बिलियन डॉलर्स






