इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारतीय गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शेवटचा आणि ५ वा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. हा कसोटी सामना शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार होता. मात्र सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच सामना रद्द करण्यात आला. हा सामना रद्द झाल्यानंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी यावर नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि मुख्य फिजिओ नितीन पटेल कोरोना संक्रमित आढळले होते. ज्यानंतर बुधवारी (८ सप्टेंबर) भारतीय संघाचे सहयोगी फिजिओ योगेश परमार देखील कोरोना संक्रमित आढळले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना देखील कोरोनाचे संक्रमण झाल्याची चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी या सामन्याला रद्द करण्याचे ठरवले.
त्यानंतर अनेक क्रिकेट क्षेत्रातील मंडळींनी भारतीय संघावर नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नने मॅंचेस्टरचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर नाराजी दर्शवत एक ट्विट केले. “ही खूप मोठी निराशा आहे, मालिका खूप शानदार पद्धतीने चालली होती.”
This is such a shame – as it’s been a wonderful series ! https://t.co/tPPrAJXCoT
— Shane Warne (@ShaneWarne) September 10, 2021
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने मात्र भारताचा बचाव करत ट्विट केले. ज्यात पीटरसनने लिहिले की, “भारतीय संघाने हा कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर बोट उचलणे योग्य नाही.”
यावर पीटरसनने दक्षिण आफ्रिकेचा देखील हवाला दिला. ज्यात लिहिले की, “इंग्लंडने देखील कोरोनाच्या भितीमुळे दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला होता. ज्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे आता भारतीय संघाची आलोचना करणे योग्य नाही.”
https://twitter.com/KP24/status/1436242834378698755
तसेच नेहमी भारताविरुद्ध ट्विट करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील आपले मत मांडले. वॉनच्या मते भारतीय संघाने इंग्लिश क्रिकेटच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवला आहे. तर इंग्लंडचे माजी फलंदाज मार्क बुचर यांनी ५ वा कसोटी सामना रद्द होण्याला इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) जबाबदार धरले आहे.
India have let English Cricket down !!! But England did let South African Cricket down !!!
— Michael Vaughan (@MichaelVaughan) September 10, 2021
त्यांच्या मते १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा कसोटी सामना रद्द होण्याला ते एक कारण असू शकते. कारण, जर कोणताही भारतीय खेळाडू कोरोनाच्या अहवालात संक्रमित आढळला, तर त्याला कमीत कमी १० दिवसांसाठी ब्रिटनमध्ये विलगीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने देखील यावर आपले मत व्यक्त केले. त्याच्या मते दोन्ही संघ जर या मालिकेला पूर्ण करू शकले असते, तर खूप चांगले झाले असते. तसेच बायो बबल आणि ही मालिका आयोजन करण्यासाठी जे काही करण्यात आले होते, त्याला पाहता ही मालिका अशाप्रकारे समाप्त होने निराशजनक असल्याचे देखील नासीर म्हणाला.
मात्र, यादरम्यान आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) भारतीय संघाच्या सामना न खेळण्याचा निर्णयावर पाठिंबा दर्शवला. याबाबत आरसीबीने एक ट्विट करत लिहिले की, “यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांची सुरक्षा आणि आरोग्य सर्वतोपरी आहे. त्यामुळे भारतीय संघाने हा योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही प्रार्थना करतो की, सर्वजण यामध्ये सुरक्षित असावेत.”
दरम्यान, आतापर्यंत झालेल्या ४ कसोटी सामन्यात भारतीय संघ २-१ ने आघाडीवर होता. ज्यानंतर ५ वा कसोटी सामना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र हा कसोटी सामना नंतर पुन्हा एकदा खेळविण्याचा विचार दोन्ही क्रिकेट बोर्डद्वारा चालू आहे. लवकरच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
–शुबमन गिलला सारा तेंडुलकरने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; अफेअरच्या चर्चांना पुन्हा उधाण
–भारत-इंग्लंड शेवटची कसोटी रद्द होताच रवी शास्त्रींवर चाहत्यांनी साधला निशाणा; मीम्सही व्हायरल
–‘कोहलीला भेटण्यासाठी रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये झाला सहभागी’, शुबमन गिलचे ट्वीट तुफान व्हायरल