मुंबई । भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि पश्चिम बंगाल राज्याचे राज्य क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ संपूर्ण शुक्ला परिवारास क्वारंटाइन करण्यात आले. लक्ष्मी रतन शुक्ला यांची पत्नी स्मिता सान्याल शुक्ला पश्चिम बंगाल राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामधे उपसचिव पदावर कार्यरत आहेत.
भारतीय संघाकडून तीन वनडे सामने खेळणारे आणि बंगालचे माजी कर्णधार शुक्ला पीटीआयशी बोलताना म्हणाले की, “माझी पत्नी स्मिता हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिला थोडासा ताप आला होता. डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. मी, माझी दोन मुले आणि माझे आईवडील घरामध्येच क्वारंटाइनमध्ये आहोत. आम्ही आमची देखील तपासणी केली आहे.”
लक्ष्मी रतन शुक्ला यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावरून हावडा उत्तर विधानसभा मतदार संघामधून निवडून आले होते. त्यांनी निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रुपा गांगुली यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे राज्य क्रीडा मंत्रिपद देण्यात आले.
लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपले तीन महिन्यांचे वेतन आणि बीसीसीआयकडून मिळणारी तीन महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहे. 1999 साली भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या या खेळाडूला दुखापतीने घेरले आणि त्यांची कारकीर्द लवकर संपली. मात्र ते स्थानिक क्रिकेट खेळत राहिले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त सामने खेळणारे लक्ष्मीरतन शुक्ला आयपीएल विजेता केकेआरच्या संघाचे सदस्य देखील होते.