टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आरपी सिंगचा मुलगा हॅरी सिंग याला इंग्लंडकडून कसोटी सामन्यात मैदानात उतरण्याची संधी मिळाली आहे. हॅरी सिंगची इंग्लंड संघासाठी 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हॅरी ब्रूक मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर त्याच्या जागी हॅरी सिंगला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण करण्यात आलं.
हॅरी सिंग इंग्लंडमध्ये लँकेशायरकडून क्रिकेट खेळतो. तो इंग्लंडच्या मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. हॅरीसोबतच चार्ली बर्नार्ड आणि केशा फोन्सेका हे दोघे 12वे खेळाडू म्हणून उपलब्ध होते, मात्र त्यांना मैदानावर येण्याची संधी मिळाली नाही.
हॅरी सिंगचे वडील आरपी सिंग यांनी 1980 च्या दशकात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. ते डाव्या हातानं वेगवान गोलंदाजी करायचे. आरपी सिंग यांनी 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले होते. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द अतिशय चमकदार राहिली आहे. आरपी सिंग यांनी भारतासाठी 59 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 150 विकेट घेतल्या असून 1413 धावाही ठोकल्या आहेत.
हॅरी सिंगही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला उभारणा देण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. त्यानं या वर्षाच्या सुरुवातीला वन डे चषकात लँकेशायरसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केलं. त्यानं 7 सामन्यांमध्ये 12.42 च्या सरासरीनं 87 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 64.44 आणि सर्वोच्च धावसंख्या 25 अशी होती. याशिवाय हॅरीनं चेंडूनही योगदान दिलं. त्यानं ऑफब्रेक स्पिन गोलंदाजी करत दोन विकेट्स घेतल्या होत्या.
हॅरी इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेटही खेळला आहे. तो 2022 साली अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडसाठी मैदानात उतरला होता. शिवाय त्याची श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेदरम्यान इंग्लंडच्या अंडर-19 संघातही निवड झाली होती.
हेही वाचा –
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री
फुटबॉलनंतर रोनाल्डोचा यूट्यूबवरही धुमाकूळ! अवघ्या 90 मिनिटांत मोडले सर्व रेकॉर्ड
श्रीलंकेच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम! बलविंदर सिंग संधू यांचा 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला