भारताचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांची केनिया क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 51 वर्षीय डोडा गणेश यांनी 1997 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं. ते उजव्या हातानं वेगवान गोलंदाजीसह खालच्या फळीत फलंदाजी करायचे. मात्र ते जास्त काळ भारतीय संघाकडून खेळू शकले नाही. असं असलं तरी त्यांचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेकॉर्ड शानदार राहिला आहे.
डोडा गणेश यांनी 1997 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. डोडा गणेश यांनी भारतासाठी 4 कसोटी आणि एक वनडे सामना खेळला. कसोटीच्या 7 डावांमध्ये त्यांनी एकूण 25 धावा केल्या. तर एकमेव एकदिवसीय सामन्यात त्यांच्या बॅटमधून 4 धावा निघाल्या. गोलंदाजीत त्यांनी कसोटीमध्ये 5 तर एकदिवसीयमध्ये 1 विकेट घेतली.
डोडा गणेश यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द काही खास राहिली नसली तरी त्यांचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यांनी कर्नाटकसाठी खेळताना 104 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2,023 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्यांनी एक शतक आणि 7 अर्धशतकं झळकावली. गोलंदाजीत त्यांनी 365 विकेट घेतल्या आहेत. डोडा गणेश यांनी 89 लिस्ट ए सामने खेळले. यामध्ये त्यांच्या बॅटमधून 525 धावा निघाल्या. याशिवाय त्यांनी 128 बळीही घेतले आहेत.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डोडा गणेश यांनी राजकारणातही हात आजमावला. मात्र ते तेथे फारसे यशस्वी होऊ शकले नाही. याशिवाय त्यांनी 2012-13 मध्ये गोवा क्रिकेट संघाचे कोच म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांनी 2016 मध्ये ‘बिग बॉस कन्नड’च्या चौथ्या सिझनमध्ये भाग घेतला होता, जेथे ते 2 आठवडे राहिले होते.
हेही वाचा –
17 वर्षांचा सचिन सर्वांना पुरून उरला! आजच्याच दिवशी ठोकलं होतं कारकिर्दीतील पहिलं शतक
श्रीलंकेची दुहेरी चाल; प्रतिस्पर्धांच्या संघातील खेळाडूलाचं बनवलं फलंदाजी प्रशिक्षक
‘केएल राहुल जगातील सर्वोत्तम…’ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल