येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने काही महिन्यांपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच भारताला या सामन्यानंतर इंग्लंडमध्येच इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
या एकूण ६ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. मात्र, या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पंड्याला स्थान देण्यात आलेले नाही. याबद्दल माजी क्रिकेटपटूने निराशा व्यक्त केली आहे.
भारतीय संघासाठी २८ कसोटी सामने आणि ५३ एकदिवसीय सामने खेळलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटपति राजू यांनी स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “न्यूझीलंड संघाकडे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांची फलंदाजी देखील मजबूत आहे. त्यांचा अष्टपैलू खेळाडू काइल जेमिसन चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या उंचीचा फायदा घेत, भारत, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “न्यूझीलंड संघाकडे चांगले, वेगवान गतीने गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. तर भारतीय संघाकडे उत्कृष्ट फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. परदेशात, याच गोष्टीत हार्दिक पंड्या संघात संतुलन ठेवायचे काम करतो. भारतीय संघाला त्याची कमतरता जाणवेल.”
हार्दिक पंड्या दुखापतीतून बाहेर आल्यापासून त्याला गोलंदाजी करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे तो फार कमी वेळा गोलंदाजी करताना दिसला आहे. हेच एक महत्त्वाचे कारण त्याची निवड न होण्यामागे असल्याची चर्चा आहे.
तसेच राजू पुढे म्हणाले की, “भारतीय संघाकडे उत्कृष्ट जलद गोलंदाज आहेत. जे जलद गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर आणखी धारदार गोलंदाजी करतील. भारतीय संघात ईशांत शर्मा आहे. ज्याने या कसोटीमध्ये ३०२ गडी बाद केले आहेत. मोहम्मद शमीने १८० आणि जसप्रीत बुमराहने ८३ गडी बाद केले आहेत. जर तिथे परिस्थिती अनुकूल असेल तर, अश्विन आणि जडेजा देखील उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.”
महत्त्वाच्या बातम्या –
“देशापुढे वैयक्तिक मुद्दे गौण”, ‘त्या’ वादावर मितालीने टाकला पडदा
आर्चर बाबा की जय! आयपीएल पुनरागमनाच्या घोषणेनंतर ६ वर्षांपूर्वीचे ‘हे’ ट्विट व्हायरल