नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेला दुसरा टी२० सामना युवा भारतीय फलंदाज इशान किशन याच्यासाठी खूप विशेष राहिला. या सामन्याद्वारे २२ वर्षीय इशानने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. याबरोबरच पदार्पणाच्या सामन्यात अफलातून अर्धशतक करत त्याने सर्वांची मने जिंकली. यानंतर चहूबाजूंनी इशानच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. यात माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यानेही उडी घेत त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत सेहवागने लिहिले की, ‘झारखंडच्या एका युवा यष्टीरक्षक फलंदाजाने वरच्या फळीत जागा मिळवली आणि त्याची कुवतही सिद्ध केली. यापुर्वीही असेच काहीसे घडले आहे. इशान किशनची निर्भय आणि आक्रमक फलंदाजी आवडली.’
अशाप्रकारे सेहवागने अप्रत्यक्षपणे आपल्याला इशानमध्ये माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीची झलक पाहायला मिळाल्याचे म्हटले आहे. इशानचा जन्म झारखंड राज्यातील असल्याने त्याने झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. त्याच्याआधी धोनीनेही झारखंड राज्याचे प्रतिनिधित्त्व केले होते.
https://twitter.com/virendersehwag/status/1371140338149068800?s=20
अशी राहिली इशान किशनची कामगिरी
डावखुरा फलंदाज इशानने आयपीएलमधील त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत भारतीय संघात जागा मिळवली. त्याला शिखर धवनच्या जागी दुसऱ्या टी२० सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत इशांतने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. दरम्यान त्याने ४ षटकार आणि ५ चौकार मारले.
मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज असलेल्या इशानने आतापर्यंत ५१ आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ७ अर्धशतकांच्या मदतीने १२११ धावा केल्या आहेत. तर देशांतर्गत क्रिकेटचे मैदानही त्याने गाजवले आहे. ४४ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने २६६५ धावा केल्या आहेत. तर ११ अ दर्जाच्या सामन्यात २५४९ धावा आणि ९५ देशांतर्गत टी२० सामन्यात २३७२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या टी२०त पाहुण्यांचा दारुण पराभव; इंग्लंडच्या संघनायकाने ‘यांच्यावर’ फोडले पराभवाचे खापर
आऊट ऑफ फाॅर्म विराटने सामन्याआधी लावला होता एबीला फोन, पाहा काय दिला होता सल्ला
‘वडापाव खूपच महत्वाचा,’ सामन्यादरम्यान रोहितचा लपूनछपून नाश्ता; नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया