भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. कुंबळे याला सोमवारी (दि. 11 सप्टेंबर) बंगळुरू येथील खासगी वाहतूक सेवा बंदचा फटका बसला. एवढंच काय, तर त्याला घरी जाण्यासाठी चक्क विमानतळाहून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा लागला. या बंदचा फटका सामान्य जनतेवरही पाहायला मिळाला. अशात कुंबळेने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधत आहे. या फोटोत दिसते की, तो विमानतळाहून सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करून घरी जात आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहिलेल्या अनिल कुंबळे (Anil Kumble) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट चाहतेही हा फोटो पाहून हैराण झाले आहेत. मात्र, काही चाहत्यांनी कुंबळेने उचललेल्या या पावलाचे कौतुकही केले आहे. कुंबळे विमानतळाहून आपल्या घरी बनाशंकरी भागात जाण्यासाठी बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) बसमध्ये बसला. यादरम्यान त्याने आपल्या प्रवासातील फोटोही चाहत्यांसोबत शेअर केला.
त्याने हा फोटो शेअर करत लक्षवेधी कॅप्शन लिहिले, “आज विमानतळाहून बीएमटीसीने घरी परतण्याचा प्रवास.” कुंबळेची ही पोस्ट बघता बघता सर्वत्र व्हायरल झाली. या फोटोला आतापर्यंत 43 हजारांहून अधिक लाईक्सचा मिळाले आहेत.
एकाने हसणाऱ्या इमोजीचा वापर करत कमेंट केली की, “बंगळुरू येथे आज बंद असल्यामुळे खासगी वाहने नाहीत. त्यामुळे त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सार्वजनिक वाहतूक करणारे सेलिब्रेटी नेहमीच आम्हाला गरजेनुसार त्यांचा वापर करण्यास प्रेरित करतात.” आणखी एकाने कौतुक करत लिहिले, “सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे उत्तम उदाहरण. छान अनिल.”
कुंबळेची कारकीर्द
अनिल कुंबळे हा जगातील दिग्गज फिरकी गोलंदाजांमध्ये गणला जातो. तो भारताकडून सर्व क्रिकेट प्रकारात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. अनिल कुंबळे 956 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्या सामन्यांविषयी बोलायचं झालं, तर त्याने 132 कसोटी सामने आणि 271 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 29.65च्या सरासरीने 619 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 149 धावा खर्चून एका डावात 10 विकेट्स घेण्याची त्याची सर्वोत्तम कसोटी गोलंदाजी कामगिरी आहे. तसेच, वनडेत त्याने 30.9च्या सरासरीने 337 विकेट्स घेतल्या आहेत.
याव्यतिरिक्त फलंदाजीतही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने कसोटीत 1 शतकासह 2506 धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत त्याच्या नावावर 938 धावांचा समावेश आहे. (former legend spinner anil kumble takes bus ride back home amid transporters strike in bengaluru read here)
हेही वाचा-
भारताविरुद्धचा पराभव बाबर आझमच्या जिव्हारी! सामन्यानंतर म्हणाला, ‘भारताच्या सलामीवीरांनंतर विराट-राहुल…’
पाकिस्तानविरुद्धच्या सर्वात मोठ्या विजयानंतर रोहितचा आनंद गगनाला भिडला; म्हणाला, ‘हे फक्त…’