गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. परंतु चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ मध्ये जोरदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच चेन्नई संघातील खेळाडू जोरदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. यंदा चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाची जोरदार कामगिरी पाहून न्यूझीलंड संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि आता समालोचकाची भूमिका पार पाडणारा स्कॉट स्टायरिस भलताच खुश झाला आहे. त्याने चेन्नईच्या कामगिरीचे श्रेय त्यांचा कर्णधार एमएस धोनीला दिले आहे.
धोनी किती चाणक्य आहे, हे संपूर्ण क्रिकेटविश्वाला माहीत आहे. स्कॉट स्टायरिसने म्हटले की, “मी एमएस धोनीने केलेल्या अविश्वसनीय नेतृत्वामुळे आश्चर्यचकित झालो आहे. त्याने जे मैदानाबाहेर केले, तेच त्याने मैदानात देखील केले आहे. त्याला हे माहीत होते की, त्याने गतवर्षी जे केले होते, तेच यंदाही करण्याचा प्रयत्न केला तर ते कामी येणार नाही. त्यामुळे त्याने अनेक बदल करून पाहिले. तो अविश्वसनीयरित्या खूप हुशार होता. त्याने या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चातुरपणाचा वापर केला.”
यापूर्वीही सीएसकेच्या कामगिरीवर केले होते भाष्य
चेन्नई सुपर किंग्ज संघाची जोरदार कामगिरी पाहून स्कॉट स्टायरिस म्हणाला होता की, “चेन्नई सुपर किंग्ज संघाने गतवर्षी केलेल्या निराशाजनक कामगिरी नंतर या हंगामात जोरदार पुनरागमन केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, तो एक वाईट काळ होता. खरं सांगू तर मला या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती. परंतु हा एक समजूतदार संघ आहे. त्यांनी यावेळी काही स्मार्ट निर्णय घेत दमदार कामगिरी केली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘असे केले नसते तर आज बाबा आमच्यासोबत नसते,’ अश्विनने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग
बलाढ्य मुंबई इंडियन्सला मिळणार ‘या’ धुरंधरांची साथ, मिड सिजनमध्ये होऊ शकतात ताफ्यात दाखल
भर सामन्यात भिडले पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू, पूर्ण १ षटक चालला विवाद; बघा व्हिडिओ