श्रीलंका संघाचा सध्या सर्वात कठीण काळ सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत श्रीलंका संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पहिल्या टी-२० सामन्यात देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने श्रीलंका संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Former Pakistani Cricketer Danish kaneriya slams Micky arthur)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर श्रीलंका संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये दोघेही मैदानावर वाद घालताना दिसून आले होते. त्यानंतर खेळाडूंचे लक्ष क्रिकेटवर केंद्रित करण्यासाठी मिकी आर्थर यांनी खेळाडूंना सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.
या मुद्द्यांवरुन माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कानेरिया यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवरून आर्थरवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, “मिकी आर्थर यांनी आपल्या खेळाडूंच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे. परंतु या सर्व गोष्टींवर लक्ष न देता, त्यांनी प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध योग्य योजना आखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा सोशल मीडियाचा काळ आहे आणि बायो बबलमध्ये खेळाडू याचा वापर करणारच.”
“खरे तर, एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय करत आहात? तुम्हा संघाला काय परिणाम मिळवून दिला? तुम्हाला या युवा खेळाडूंच्या संघाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, पराभूत झाल्यावर त्यांच्यावर संताप व्यक्त करण्याची नव्हे. त्यांना निरुपयोगी सल्ले देणे थांबवा. मुळात आर्थरनी ज्या संघाला प्रशिक्षण दिले आहे. त्या प्रत्येक संघाची कामगिरी ढासळली आहे,” अशा शब्दात कानेरियाने टिका केली.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार
येत्या ऑक्टोबर महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत कुठला संघ बाजी मारेल याबाबत अनेक दिग्गजांनी आपले मत मांडले आहे. अशातच माजी पाकिस्तान क्रिकेटपटू दानिश कानेरिया यांच्या मते, भारतीय संघ हा आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. त्यांनी म्हटले की, “जर हा भारतीय संघ अशाप्रकारे कामगिरी करत राहिला तर हा संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
बोंबला! चक्क लाईव्ह सामन्यात घुसला चोर, क्रिकेटपटूंनी मॅच सोडून केला पाठलाग अन्…
‘द हंड्रेड’ लीगमध्ये भारताच्या जेमिमाचा जलवा कायम, अवघ्या १० चेंडूत चोपल्या ४० धावा
Video: श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला टी२० पदार्पणात आपल्या आदर्श खेळाडूकडून मिळाले ‘स्पेशल गिफ्ट’