पाकिस्तान संघातील दिग्गज गोलंदाज वसिम अक्रम याची गणना आजही दिग्गज गोलंदाजांच्या यादीत केली जाते. खेळपट्टी कुठलीही असो हा गोलंदाज आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित करायचा. गेली अनेक वर्षे त्याने पाकिस्तान संघासाठी क्रिकेट खेळले. परंतु अनेकदा असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, त्याला पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी का दिली जात नाही? किंवा वसिम अक्रमने ही जबाबदारी स्विकारण्यासाठी स्वतःहून पुढाकार का घेतला नाही? याबाबतचे संभ्रम दूर करत वसिम अक्रमने धक्कादायक खुलासा केला आहे.
पाकिस्तान संघासाठी १०४ कसोटी सामने आणि ३५६ एकदिवसीय सामने खेळलेल्या वसिम अक्रमने कधीच पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली नाही. त्याने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तान संघाला प्रशिक्षण न देण्याचे कारण सांगितले आहे.
तो म्हणाला की, “हे पहा, जेव्हा तुम्ही पाकिस्तानच नव्हे तर कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघाशी जोडले जाता; तेव्हा तुम्हाला किमान २०० ते २५० दिवस द्यावे लागतात. मला असे वाटते की, मी इतक्या दिवस पाकिस्तानपासून आणि माझ्या कुटुंबापासून दूर राहू शकत नाही. सहसा जेव्हा त्यांना माझ्या मदतीची गरज असते; तेव्हा त्यांनी संपर्क साधल्यास मी त्यांना मदत करतो.”
मी मूर्ख नाही पाकिस्तान संघाला प्रशिक्षण द्यायला
वसिम अक्रमने पुढे म्हटले की, “दुसरी गोष्ट म्हणजे, मी मूर्ख नाहीये. मी सोशल मीडियावर पाहात असतो की, कशाप्रकारे खेळाडू आपल्या प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंची निंदा करत असतात. प्रशिक्षकाची भूमिका फक्त रणनिती आखणे असते. जेव्हा संघ पराभूत होतो तेव्हा त्याची चूक नसते. तरीही त्याच्यावर पराभवाचे खापर फोडले जाते, त्याला जबाबदार धरले जाते. याची मला भीती वाटते. कारण प्रशिक्षकांविषयी असभ्यता मी सहन करू शकत नाही.”
कर्णधार म्हणून वसिम अक्रम हिट
वसिम अक्रम हा पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. त्याने पाकिस्तान संघाचे एकूण १०९ सामन्यात नेतृत्व केले होते. सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा तो इमरान खाननंतर दुसरा क्रिकेटपटू आहे. त्याच्या वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ३५६ सामने खेळले होते. यात त्याला ५०२ गडी बाद करण्यात यश आले होते. तर १०४ कसोटी सामन्यात त्याने तब्बल ४१४ गडी बाद केले होते. स्विंगचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गजाने २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १० हजार धावा करणारे मनसबदार, पहिले तीन भारतीय
चूक भोवली! तमिम इकबालचे लाईव्ह सामन्यात ‘नकोसे’ कृत्य, आयसीसीने ठोठावला मोठा दंड
विलगीकरणात ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘असे’ राहतात तंदुरुस्त, उपकर्णधाराने केला खुलासा