भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या संघाचे नेतृत्व प्रभारी कर्णधार शिखर धवन करणार आहे. श्रीलंका दौर्यावर भारतीय संघाला श्रीलंका संघाविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना 13 जुलैपासून सुरू होणार आहे. हा पहिला एकदिवसीय सामना सुरु होण्याअगोदरच भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणने एकदिवसीय मालिकेत भारतीय संघात खेळण्याची शक्यता असणाऱ्या 11 खेळाडूंची निवड केली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने निवडलेल्या संघामध्ये काही वरिष्ठ खेळाडूंना स्थान मिळाले नाही.
सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि पृथ्वी शॉ
स्टार स्पोर्ट्सवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान व्हीव्हीएस लक्ष्मणने श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी सलामीवीर फलंदाज म्हणून शिखर धवन आणि पृथ्वी शॉची निवड केली आहे. क्रिकेट चाहत्यांनाही याच जोडीला सलामीवीर फलंदाजाच्या रूपात पाहायचे होते. कारण या सलामीवीर जोडीने आयपीएलदरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाकडून अनेक सामन्यांमध्ये वेगवान धावा बनवल्या होत्या.
अशा परिस्थितीमध्ये देवदत्त पडिक्कलला एकदिवसीय मालिकेच्या संघांमध्ये स्थान मिळणे खूप अवघड दिसून येत आहे. त्याने एकदिवसीय स्वरुपातील विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. देवदत्तने 7 सामन्यांमध्ये 737 धावा केल्या होत्या. प्रत्येक डावामध्ये त्याने 50 हून अधिक धावा केल्या होत्या. यामध्ये 4 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु या स्पर्धेमध्ये पृथ्वी शॉ सर्वाधिक धावा बनविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर असून शॉने सर्वाधिक 827 धावा बनविल्या होत्या. तर देवदत्तचा या यादीमध्ये दुसरा क्रमांक लागतो.
ऋतुराज गायकवाड आणि नितीश राणा यांना वगळण्यात आले
व्हीव्हीएस लक्ष्मणने या संघात तिसऱ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादवची, चौथ्या क्रमांकासाठी संजू सॅमसन आणि पाचव्या क्रमांकासाठी मनीष पांडेची निवड केली आहे. अशामध्ये ऋतुराज गायकवाड, नितीश राणा आणि ईशान किशनसारख्या युवा खेळाडूंना संघामध्ये स्थान देण्यात आले नाही. ईशान इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत पहिला सामन्यामध्ये अर्धशतक केले होते. परंतु नितीश राणाने अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही.
पांड्या बंधू खेळणार
माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याची संघात निवड केली. त्याचबरोबर गोलंदाज म्हणून फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवचा देखील संघात समावेश केला. परंतु या दोन्ही फिरकीपटूने मागील काही दिवसांपासून चांगली कामगिरी केली नाही. तर वेगवान गोलंदाज म्हणून उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरचा देखील या संघात समावेश केला. यामुळेच डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाला संघात स्थान मिळण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल.
या चर्चेदरम्यान माजी भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाण म्हणाला की, जर हार्दिक पांड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देणार असतील तर आणखी एका फलंदाजाचा संघात समावेश करावा लागेल. कृणाल पांड्याच्या जागी नितीश राणा याला संघात स्थान मिळावे असे इरफान पठाणचे मत आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी निवडलेली भारताची प्लेइंग इलेव्हन :- शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बाकी कोणी असो वा नसो, SRHमध्ये आम्हाला तीच पाहिजे’; चाहत्यांची मजेशीर मागणी
शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यासह आयपीएलमधूनही बाहेर, पाहा कधीपर्यंत राहणार क्रिकेटपासून दूर?
टी२० विश्वचषकापुर्वी अफगानिस्तान संघात मोठा बदल, अव्वल फिरकीपटू राशिद बनला ‘नवा कर्णधार’