जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित टी२० स्पर्धा म्हणजे आयपीएल. गेल्या अनेक वर्षांत आयपीएलने यशाचे शिखर गाठले आहे. आतापर्यंत आयपीएलचे १३ यशस्वी हंगाम पार पाडले. १४ व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होईल. कोरोना महामारीमुळे हा हंगामदेखील मागील वर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळला जाईल.
सध्या आयपीएलमध्ये अनेक भारतीय प्रतिभावंत खेळाडू आहेत, जे राष्ट्रीय संघात खेळतात. आयपीएल स्पर्धेपूर्वी भारतीय संघाकडे गोलंदाजी इतकी मजबूत नव्हती. अनेक वेळा खेळाडू जखमी व्हायचे. तर संघात बर्याच वेळा वेगवान गोलंदाज यायचे आणि फ्लॉप व्हायचे. आयपीएलमुळे आज भारतीय संघात १४५ किमी प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आले. जसप्रीत बुमराह, खलील अहमद, नवदीप सैनी इत्यादी आयपीएलमधून भारतीय संघाला मिळालेले वेगवान गोलंदाज आहेत. या सर्वांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली आणि निवडकर्त्यांना विचार करायला भाग पाडले.
या लेखामध्ये भारताच्या ४ गोलंदाजांविषयी जाणून घेऊया ज्यांनी आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकली आहे. त्यापैकी तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज आहेत. पर्पल कॅप ही हंगामातील सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते.
आरपी सिंग (२००९)
आरपी सिंग हा आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे. २००९ च्या आयपीएलमध्ये त्याला हे यश मिळाले. आरपी सिंगने डेक्कन चार्जर्सकडून खेळत १६ सामन्यांत २३ बळी घेतले. एकदा त्याने ४ बळीही घेतले होते. ७ पेक्षा कमीच्या इकॉनॉमी रेटने आरपी सिंगने धावा दिल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये एकूण ८२ सामने खेळले.
प्रज्ञान ओझा (२०१०)
आयपीएल २०१० मध्ये या फिरकी गोलंदाला पर्पल कॅप मिळाली होती. डेक्कन चार्जर्सकडून खेळताना प्रग्यान ओझाने पर्पल कॅप मिळवलेली. डेक्कन चार्जर्सकडून गोलंदाजांनी सलग दुसऱ्यांदा असा चमत्कार केला. प्रग्यान ओझाने त्यावेळी १६ सामने खेळले आणि २१ बळी घेतले. हा एकमेव फिरकी भारतीय गोलंदाज आहे ज्याने पर्पल कॅप मिळवली होती. ओझाने आपल्या आठ वर्षाच्या कारकिर्दीत डेक्कन चार्जर्स व मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले.
मोहित शर्मा (२०१४)
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेल्या मोहित शर्मानेही आयपीएलमध्ये पर्पल कॅप मिळवली होती. २०१४ च्या आयपीएलमध्ये मोहित शर्माला पर्पल कॅप मिळवण्यात यश आलेले. त्याने एकूण १६ सामने खेळून २३ गडी बाद केले होते. त्यात एकदा त्याने एका डावात ४ बळीही घेतले. या कामगिरीनंतर त्याला २०१५ चा विश्वचषक देखील खेळण्याची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत ८६ आयपीएल सामने खेळले असून ९२ बळी मिळवले आहेत.
भुवनेश्वर कुमार(२०१६, २०१७)
आयपीएलमध्ये दोन वर्षे पर्पल कॅप जिंकणारा भुवनेश्वर कुमार हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. ड्वेन ब्राव्होनेही दोनदा पर्पल कॅप जिंकली होती. परंतु, भुवनेश्वर कुमारने सलग दोन वर्ष पर्पल कॅप जिंकली. सन २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने १७ सामन्यांत २३ बळी घेतले. यानंतर, पुढच्या वर्षी पुन्हा १४ सामने खेळत २६ बळी घेतले. यावेळी त्याने एका डावात ५ बळीही घेतले. आतापर्यंत त्याने १२१ सामने खेळले असून १३६ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ : ज्युनियर धोनीने घेतली सिनियर धोनीची मुलाखत, एका खास गोष्टीचा केला खुलासा
बिहारच्या ‘या’ युवा खेळाडूचा समावेश झाला दिल्ली कॅपिटल्सच्या संघात, वाचा संपूर्ण कारकीर्द