पुणे । स्वामी समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्री नॅशनल स्कूल आणि सह्याद्री कुस्ती संकुल तसेच महाराष्टÑ कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३७ व्या सब-ज्युिनअर गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला फ्री-स्टाईल गटातील मल्लांनी समाधानकारक यश दिले. या प्रकारात महाराष्ट्राने १ रौप्य पदक आणि ५ कांस्य असे एकूण सहा पदके मिळवली. ५१ किलो वजनी गटात कोल्हापूरचा अतुल चेचर रौप्यपदकाचा मानकरी ठरला. हरियाणाच्या विपीनकडून तो अंतिम फेरीत हरला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. प्रतिस्पर्धी तगडा असला, तरी अतुलने आक्रमक सुरवात केली होती. वेगवान कुस्ती करताना त्याने पहिल्या फेरीत आघाडी देखील घेतली होती. मात्र, उत्तरार्धात विपीनच्या बदलत्या नियोजनाचा त्याला अंदाज आला नाही. त्यामुळे गोंधळलेला अतुल आक्रमणात कमी पडला. याचा फायदा विपीनने अचूक उचलला. अखेरच्या काही सेकंदात पुन्हा एकदा अतुलने मुसंडी मारली होती. मात्र, त्याला निर्णायक डाव करण्यात अपयश आल्याने त्याला अखेर ५-६ असा पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्राला एकमेव रौप्यपदक मिळवून देणारा अतुल चेचर हा मुळचा कोल्हापूरचा असला, तरी तो मांजरीच्या शिवछत्रपती कुस्ती संकुलात सराव करतो. विकास पाटील, प्रकाश सावंत, तानाजी पाटील, सत्यवान सावंत यांच्याकडे तो प्रशिक्षण घेतो. त्याची घरची अतिशय बिकट असून त्याचे वडील गवंडी काम करतात, त्यामुळे अतिशय मेहनतीने त्याने मिळविलेले यश विशेष आहे. त्याचे प्रशिक्षक त्याला सर्वच गोष्टीत मोलाची मदत करतात. त्याची १० वीची परीक्षा सुरु असताना देखील त्याने स्पर्धेत खेळून पदक मिळविले. मागील वर्षीच्या सबज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत त्याला सुवर्ण होते.
महाराष्ट्राच्या संकेत ठाकूर (५१ किलो), वेताळ शेळके (७१ किलो), रमेश इंगवले (५५किलो), सौरभ इगवे (४८ किलो) आणि विपुल थोरात (४५ किलो) या मल्लांनी कांस्यपदक मिळविले. या प्रत्येक मल्लांनी पहिल्या फेरीपासून चांगली सुरवात केली होती. मात्र, त्यांना आपल्या खेळात सातत्य राखण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांची घोडदौड कांस्यपदकापर्यंतच पोचू शकली.
मल्लाने वय लपविल्याने गालबोट
तीन दिवस स्पर्धा सुरळीत सुरू असताना अखेरच्या दिवशी मल्लाने वय लपविल्याने गालबोट लागले. स्पर्धेतील ८० किलो वजनी गटात रौप्यपदकाचा मानकरी ठरलेल्या रवी नरेश याच्या विरुद्ध आक्षेप करण्यात आला होता. बोन टेस्टमध्ये तो दोषी आढळल्याने त्याचे पदक काढून घेण्यात आले. त्याचबरोबर उपांत्य फेरीत त्याने हरवलेला मल्ल देखील बोन टेस्टमध्ये दोषी आढळल्याने या वजनीगटातील रौप्यपदक कुणालाच देण्यात आले नाही.
स्पर्धेच्या दिवशी देखील हरियानाने आपले वर्चस्व कायम राखले. फ्रिस्टाईल प्रकारात २२० गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. दिल्ली १५६ गुणांसह दुसºया तर महाराष्ट्र १०२ गुणांसह तीसºया क्रमांकावर राहीले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, आयोजक विजय बराटे, नामदेवराव मोहिते, काका पवार, अमोल बुचडे, अमोल बराटे आदी उपस्थित होते.
निकाल : ४५ किलो : अमित कुमार (सेनादल), सुखदेव सतबीर (हरियाणा), विपुल थोरात (महाराष्ट्र), विशांत (दिल्ली)
४८ किलो : अमन सोनबीर (हरियाणा), जगदीप (हरियाणा), अनिल कुमार (बिहार), सौरभ इगवे (महाराष्ट्र)
५१ किलो : विपीन (हरियाणा), अतुल चेचर (महाराष्ट्र), संकेत ठाकूर (महाराष्ट्र), प्रवीण (सेनादल)
५५ किलो : रोहीत (हरियाणा), मनोज तिवारी (उत्तरप्रदेश), परविंदर धनसिंग (हरियाणा), रमेश इंगवले (महाराष्ट्र)
६० किलो : रविंदर (हरियाणा), परविंदर (हरियाणा), उत्तम (साई), आकाश दहिया (सेनादल),
६५ किलो : रोहीत (दिल्ली), सचिन (सेना दल), मंजूनाथ (कर्नाटक), राहुल (हरियाणा)
७१ किलो : गौरव (उत्तरप्रदेश),अंकीत कुमार (दिल्ली), संदीप (हरीयाणा), वेताळ शेळके (महाराष्ट्र)
८० किलो :मुलायम यादव (उत्तरप्रदेश), अजय मलिक (हरियाणा), अंकीत वत्स(दिल्ली),
९२ किलो : सुनील (कर्नाटक), प्रीतम (हरियाणा), मोनू दहिया (दिल्ली), दिपक (हरियाणा)
११० किलो : अनिरुद्धकुमार बलवान (दिल्ली),अंकीत कुमार (उत्तरप्रदेश), तरुण (झारखंड), रॉबीनसिंग हूडा (हरियाना)