भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली हे पुन्हा वादात सापडताना दिसत आहेत. मागील चार-पाच महिन्यांपासून विराट कोहलीसोबतचा वाद, निवड समितिच्या कारभारात हस्तक्षेप इत्यादी आरोपांच्या चर्चा सुरू असताना गांगुली यांची पोलखोल करणारे करणारे एक वृत्त पुन्हा समोर आले आहे. सौरव गांगुली टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेत सहभागी असतात अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. गांगुली यांच्याकडून या अफवा असल्याचे उत्तर आले होते. मात्र, बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयमधील तीन आजी माजी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत गांगुली हजर असत. गांगुली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवड समितीच्या बैठकीला उपस्थित असत. ते बीसीसीआयचे सर्वेसर्वा असल्याने त्यांना कोणी काही बोलत नसत. मात्र, त्यामुळे निवड समिती पूर्ण स्वातंत्र्याने निर्णय घेऊ शकत नव्हती.
बीसीसीआय संविधानाचा अपमान
बीसीसीआय संविधानानुसार, बोर्डाचा अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत उपस्थित राहू शकत नाही. बीसीसीआय सचिव बैठकीचे संयोजक म्हणून उपस्थित राहू शकतात. अध्यक्षांमुळे निवडसमिती दबावात येऊ शकते. बीसीसीआय अध्यक्ष निवडसमितीच्या बैठकीस उपस्थित राहणे बीसीसीआय संविधानाचा अपमान ठरते.
गांगुलीने केले होते खंडन
विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवल्यानंतर गांगुली व कोहली यांच्यातील वाद चांगलाच तापला होता. गांगुली हे निवड समितीला दबावाखाली ठेवतात व आपल्या पसंतीचे खेळाडू निवडायला लावतात अशी माहिती समोर आली होती. मात्र, गांगुली यांनी पुढे येऊन या अफवा असल्याचे सांगितले होते. अगदी काही दिवसांपूर्वी अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांनीदेखील गांगुली यांनी आपली जागा संघात नक्की असल्याचे आश्वासन दिले होते, असा दावा केलेला. त्यामुळे खेळाडूंच्या निवडीत गांगुली यांची भूमिका असते, असे निदर्शनास आलेले.
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या आधी १०० कसोटी खेळणारे ११ भारतीय दिग्गज माहित आहेत का? पाहा संपूर्ण यादी (mahasports.in)