भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नजर आहे. मिस्बाह-उल-हकच्या जागी कर्स्टन यांना पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कायमस्वरूपी प्रशिक्षक बनवायचा बोर्डाचा मानस आहे. याशिवाय सायमन कॅटिच आणि पीटर मूर्स हेही प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आहेत. २०२१ च्या टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी राजीनामा दिला होता.
भारताला बनवले होते विश्वविजेता
दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर गॅरी कर्स्टन यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने २०११ मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर सायमन कॅटिच यांनी कोलकाता नाईट रायडर्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. याशिवाय, आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यापर्यंत त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (आरसीबी) मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली. पीटर मूर्स हे दोन वेळा इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. मूर्स यांनी नॉटिंगहॅमशायरसोबत नुकताच तीन वर्षांचा करार केला. मूर्स हे दोन वेगवेगळ्या संघांसह काउंटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणाऱ्या काही प्रशिक्षकांपैकी एक आहेत.
टी२० विश्वचषकापूर्वी मिस्बाह आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी पाकिस्तानी संघापासून फारकत घेतली होती. पीसीबीने माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक यांची विश्वचषकासाठी अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन व दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान वर्नोन फिलॅंडर यांना गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले. रमीझ राजा यांनी पीसीबी प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्याने पाकिस्तानी क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रमीझ राजा पूर्णवेळ परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या बाजूने आहेत. मात्र, पीसीबीला त्यांच्या आवडत्या उमेदवारांचे मन वळवणे आवश्यक आहे. कारण, आजकाल बहुतेक प्रशिक्षक फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
गोलंदाजाने फलंदाजाला काढले वेड्यात, सापळा रचून केले स्टंपिंग; पाहा विकेट ऑफ द मॅच!
‘त्याच्याशी बोलणं म्हणजे स्वतःवर चिखल उडवून घेण्यासारखे’; भज्जी आमीरवर पुन्हा बरसला