भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक पद स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा प्रशिक्षक म्हणून असणारा अनुभव दांडगा आहे.
कर्स्टन यांनी याआधी २०१४ आणि २०१५ च्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रशिक्षक पद भूषवले आहे. त्यांनी २०१४ला दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत ३ वर्षांचा प्रशिक्षक पदासाठी करार केला होता, परंतु २०१४ आणि २०१५ मध्ये दिल्ली संघ गुणतालिकेत अनुक्रमे आठवा आणि सातवा राहिला त्यामुळे त्यांना २०१५ नंतर प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आले.
या वाईट अनुभवानंतर कर्स्टन हे आयपीएलच्या ११ व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रशिक्षक पद स्वीकारून पुन्हा एकदा आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करणार आहे. परंतु अजूनतरी संघाकडून याबद्दलची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कर्स्टन यांनी आठवडाभरापूर्वीच बिग बॅश लीग मध्ये प्रशिक्षक म्हणून पदार्पण केले आहे. ते सध्या होबार्ट हरिकेन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक असताना या दोन्ही संघांना कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिलेले आहे. या बरोबरच २०११ साली भारताच्या विश्वचषक विजयातही त्यांचा प्रशिक्षक म्हणून मोलाचा वाट होता.
बंगलोर संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिट्टोरी आपल्या पदावर कायम राहणार आहे, त्यामुळे कर्स्टन फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. व्हिट्टोरीने चार वर्षांपूर्वी बंगलोरच्या प्रशिक्षक पदाची धुरा हाती घेतली होती.
त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने मिश्र कामगिरी केली आहे. २०१४ साली बंगलोर संघ गुणतालिकेत सातवा होता, तर २०१५ साली त्यांना पात्रता फेरीत चेन्नई सुपर किंग्स कडून पराभव स्वीकारावा लागल्याने तिसरे स्थान मिळाले होते.
त्याच्या पुढील वर्ष मात्र त्यांच्यासाठी खूपच चांगले होते. त्यांनी २०१६ ला अंतिम फेरीत प्रवेश केला होता मात्र त्यांना सनरायझर्स हैद्राबाद कडून पराभूत व्हावे लागले होते. २०१७ हे वर्ष बंगलोरसाठी खूप खराब वर्ष होत ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिले होते त्यांना १४ पैके फक्त ३ सामनेच जिंकता आले होते.