Head Coach Gautam Gambhir :- भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (04 ऑगस्ट) कोलंबोच्या मैदानावर झालेला दुसरा वनडे सामना 32 धावांनी गमावला. श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या भारतीय संघाला 240 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा फिरकीपटू जेफ्री वँडरसेने भारतीय फलंदाजांना 208 धावांवरच रोखले आणि संघाला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. याआधीचा पहिला वनडे सामना बरोबरीत सुटल्यामुळे आता लाज वाचवण्यासाठी भारताला 7 ऑगस्ट रोजी होणारा तिसरा व शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
दरम्यान भारतीय संघाच्या दुसऱ्या वनडेतील पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने टी20 मालिकेत श्रीलंकेचा व्हाईटवॉश केला. पण वनडे मालिकेदरम्यान गंभीरने काही चुका केल्या, ज्या वेळीच सुधारल्या नाहीत तर त्याची मोठी किंमत भारतीय संघाला चुकवावी लागेल.
केएल राहुलचा संघात समावेश
गौतम गंभीरने वनडे संघात केएल राहुल आणि रिषभ पंत या दोन यष्टीरक्षकांना संधी दिली. पंत टी20मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता, पण त्याला वनडेमध्ये संधी देण्यात आली नाही. पंतच्या जागी केएल राहुलला प्राधान्य देण्यात आले. परंतु तो अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करू शकला नाही. पहिल्या वनडे सामन्यात राहुल 43 चेंडूत केवळ 31 धावा करू शकला. यानंतर दुसऱ्या वनडेत राहुलला खाते उघडण्यात यश आले नाही. राहुलच्या फ्लॉप शोमुळे भारतीय संघाची मधली फळी कोलमडलेली दिसली.
संजू सॅमसनला वगळले
गौतम गंभीरच्या प्रशिक्षणामध्ये संजू सॅमसनला भारतीय संघात संधी मिळण्याची आशा होती, पण तसे झाले नाही. संजूला संधी मिळाली, पण अशा फॉरमॅटमध्ये (टी20 क्रिकेट) जिथे तो आधीच फ्लॉप ठरत होता. दुसरीकडे वनडेमध्ये संजूचे आकडे उत्कृष्ट आहेत. त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शानदार शतक झळकावले होते. असे असतानाही सॅमसनला वनडे मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याला संधी दिली जाते की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेतील पराभवासाठी कोलंबोची खेळपट्टी जबाबदार; सहाय्यक प्रशिक्षक नायरने सांगितलं कारण
IND vs SL भारताविरुद्ध कहर केलेल्या फिरकी गोलंदाजानं केला मोठा खुलासा, म्हणाला…
3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं