भारतीय संघाचा युवा प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याला नेहमीच भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा वारसदार म्हणूनही पाहिले गेले. मात्र, रिषभने क्षमतेनुसार मागील काही महिन्यात खेळ केलेला नाही. आयपीएलच्या 13 व्या हंगामातही त्याने चाहत्यांना निराश केले. यातच माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीरने त्याच्याबद्दल एक भाष्य केले आहे.
भारतीय संघात झाली होती निवड
२०१६ पासून इंडियन प्रीमियर लीगमधील नेत्रदीपक कामगिरीने रिषभ पंतने प्रभावित केले होते. त्याची २०१७ला भारतीय संघात निवडही झाली आणि त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरीही केली होती.
मर्यादित षटकाच्या संघातील गमावले स्थान
परंतु, 21 वर्षीय रिषभ पंतसाठी 2019 आणि 2020 हे दोन वर्षे अजिबात चांगली नव्हती. तो 2019 साली भारतीय विश्वचषक संघाचा भाग होता. परंतु त्यानंतर त्याच्या समस्येत सतत वाढ होत गेली. तो फलंदाजीत छाप सोडण्यात अयशस्वी झाला आणि मर्यादित षटकाच्या संघातील आपले स्थानही त्याने गमावले.
गौतम गंभीरने केले आवाहन
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात तो अचूक फटके खेळण्यासाठी सतत धडपड करताना दिसला. यातच रिषभ पंतची तुलना एमएस धोनीशी करू नये असे आवाहन माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरने माध्यमांना केले आहे.
“सर्वप्रथम, ‘रिषभ पंत पुढील एमएस धोनी आहे’ असे म्हणणे आपल्याला थांबवावे लागेल. माध्यमांनी ते थांबवण्याची गरज आहे. माध्यमांमध्ये या विषयावर जितकी जास्त चर्चा होईल तितकाच रिषभ पंत याबद्दल विचार करेल. तो कधीही एमएस धोनी होऊ शकत नाही. तो रिषभ पंत झाला पाहिजे.”
रिषभ पंतला बरीच प्रगती करायची आहे – गंभीर
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी लांबलचक षटकार मारायचा. रिषभ पंत हादेखील षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. फक्त या एका गोष्टीमुळे लोकं त्याची तुलना एमएस धोनीसारख्या व्यक्तीशी करू लागले. रिषभ पंतला अजून बरीच प्रगती करायची आहे. खासकरून यष्टिरक्षणात आणि फलंदाजीतही.”
आयपीएल 2020 मधील रिषभ पंतची कामगिरी
आयपीएलच्या 13 व्या हंगामात खेळलेल्या 12 सामन्यात रिषभने 109 च्या स्ट्राईकरेटने केवळ 285 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती
ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया