टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. आज (18 जून) 3 सदस्यांची क्रिकेट सल्लागार समिती भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची मुलाखत घेईल. रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर हा एकमेव उमेदवार आहे, ज्यानं या पदासाठी अर्ज केला आहे. गंभीरची ही मुलाखत ऑनलाईन होणार आहे.
राहुल द्रविड हे सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. सध्या जारी टी20 विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपेल. राहुल द्रविड या पदावर राहण्यास इच्छूक नाहीत. त्यामुळे बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. बोर्डानं 27 मे रोजी या पदासाठी अर्ज मागवले होते. गौतम गंभीरनं नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मेंटॉरची भूमिका निभावली होती. त्याच्या मार्गर्शनाखाली केकेआरचा संघ आयपीएल 2024 चा चॅम्पियन बनला होता.
यानंतर गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनेल, या चर्चांना वेग आला. गौतम गंभीरची मुलाखत घेणाऱ्या 3 सदस्यांच्या समितीमध्ये अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षण नाईक यांचा समावेश आहे. ही समिती मुख्य प्रशिक्षकासह निवड समितीतील एका पदासाठी देखील मुलाखत घेणार आहे. मुख्य निवड समितीतील सदस्य सलील अंकोला यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे.
भारतीय संघाच्या निवड समितीत सध्या दोन निवडकर्ते पश्चिम झोनमधून येतात. सलील अंकोला आणि अजित आगरकर हे ते दोन निवडकर्ते आहेत. आता नवा निवडकर्ता उत्तर झोनमधून येण्याची शक्यता आहे. अजित आगरकर गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते बनले होते. त्यांनी चेतन शर्मा यांची जागा घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
यजमान वेस्ट इंडिजची दादागिरी, अफगाणिस्तानवर 104 धावांनी मिळवला शानदार विजय
टीम इंडियाला मिळणार पुणेकर विकेटकीपर? MPL मध्ये ऋतुराज गायकवाडची विकेटमागे धमाल; पाहा VIDEO
लॉकी फर्ग्युसन टी20 क्रिकेटमध्ये 4 मेडन ओव्हर्स टाकणारा दुसरा गोलंदाज! जाणून घ्या पहिला कोण होता?