कित्येक भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटव्यतिरिक्त समाजसेवेलाही प्राधान्य देतात. इतर देशांप्रमाणे भारतावर ओढवलेल्या कोविड-१९ परिस्थितीदरम्यान अनेक क्रिकेटपटूंनी पुढाकार घेत वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मदत केली होती. आता माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर याने गरीब लोकांच्या सेवेसाठी उपहारगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (२४ डिसेंबर) दिल्लीच्या पुर्व भागात तो ‘जन रसोई’ नावाचे उपहारगृह सुरु करणार आहे. येथे गरीब लोकांना केवळ एक रुपयात दुपारचे जेवण दिले जाईल.
“गरजूंना मिळणार एका रुपयात दुपारचे जेवण”
याविषयी बोलताना गंभीर म्हणाला की, “गुरुवारपासून दिल्लीच्या गांधी नगर भागात पहिले उपहारगृह चालू करणार आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारी रोजी अशोक नगरमध्ये दुसरे उपहारगृह चालू करण्यात येईल.”
“जाती, पंथ, धर्म आणि वित्तीय परिस्थितीचा विचार न करता सर्वांना निरोगी आणि स्वच्छ अन्न मिळण्याचा अधिकार आहे. कित्येक बेघर आणि निराधार लोकांना साधे दोन वेळचे जेवण मिळत नाही, याचे मला खूप वाईट वाटते. भारत देशातील सर्वात मोठ्या कपड्यांच्या बाजारपेठांनी भरलेल्या गांधी नगरमध्ये एक उपहारगृह चालू केले जाणार आहे. हे उपहारगृह पूर्णपणे आधुनिक असेल. इथे केवळ एक रुपयात गरजू लोकांना जेवणाचा आनंद उपभोगता येईल,” असे पुढे बोलताना गंभीरने सांगितले.
उपहारगृहातील बैठक व्यवस्थेविषयी बोलताना गंभीर म्हणाला की, “येथे एका वेळेला १०० लोकांच्या बैठकीची व्यवस्था आहे. पण कोविड-१९ मुळे सध्या फक्त ५० लोकांना एकावेळी जेवण्याची परवानगी दिली जाईल. दुपारच्या जेवनात डाळ, भात आणि भाजी असेल.”
वादे नहीं, इरादे लाया हूँ…
ना मन्दिर से आरती, ना मस्जिद से आज़ान लाया हूँ…
ना राम का वास्ता, ना मोहम्मद की दुआ लाया हूँ…
इंसान हूँ, इंसान के लिए दो रोटी लाया हूँ….
वादे नहीं, इरादे लाया हूँ… #JanRasoi #FoodForAll pic.twitter.com/pFDm0MLWaR
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) December 24, 2020
निवृत्तीनंतर निवडले राजकीय क्षेत्र
२००३ ते २०१६ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केल्यानंतर गंभीरने राजकीय क्षेत्राच्या खेळपट्टीवर नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्या अनुशंगाने २०१९ साली त्याने भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश घेतला आणि पूर्व दिल्लीकडून लोकसभेची निवडणूक लढवली. तो आता पूर्व दिल्लीचा खासदार आहे.
गंभीरची क्रिकेट कारकिर्द
गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर त्याने एकूण १४७ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ११ शतकांच्या मदतीने ५२३८ धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ५८ सामने खेळत ४१५४ धावा केल्या आहेत. यात एका द्विशतक आणि ९ शतकांचा समावेश आहे. टी२० क्रिकेटमध्यही त्याची आकडेवारी प्रशंसनीय राहिली आहे. ३७ टी२० सामन्यात २७.४१च्या सरासरीने त्याने ९३२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतातील ‘या’ आठ शहरात रंगणार टी२० विश्वचषकाचा थरार; बीसीसीआयने निवडली ठिकाणे
स्टीव्ह स्मिथने थोपटली भारतीय फिरकीपटू आर अश्विनची पाठ; म्हणाला…
मोठी बातमी! भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीसाठी असा असणार ऑस्ट्रेलियाचा ११ जणांचा संघ