रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांचं टीम इंडियात भविष्य नाही असं बोललं जात आहे. रोहितनं खराब फॉर्ममुळे सिडनी कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली खेळला, परंतु तो पुन्हा एकदा फ्लॉप झाला.
भारताला आता पुढील कसोटी मालिका जूनमध्ये इंग्लंडमध्ये खेळायची आहे. अशा परिस्थितीत या दोन दिग्गजांची निवड कोणत्या आधारावर होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हे दोन्ही खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट खेळलेले नाहीत, जिथे ते चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवू शकतात. अशा स्थितीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना याबाबत विचारलं असता त्यांनी यावर उत्तर देण्यास नकार दिला.
सिडनी कसोटीतील पराभवानंतर गौतम गंभीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भवितव्यावर म्हणाला, “मी कोणत्याही खेळाडूच्या भविष्यावर बोलू शकत नाही. ते खेळाडू, त्यांची भूक आणि त्यांच्या वचनबद्धतेवर अवलंबून असतं. अपेक्षा आहे की ते भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.”
गंभीरनं संघातील प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. गंभीर म्हणाला, “प्रत्येकानं देशांतर्गत क्रिकेट खेळावं असे मला नेहमीच वाटतं. जर ते (खेळाडू) उपलब्ध असतील आणि त्यांच्यात कसोटी क्रिकेट खेळण्याची भूक असेल, तर त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल”, असं गंभीर म्हणाला.
गौतम गंभीरनं संघाच्या रिबिल्डवर बोलण्यास नकार दिला. तो म्हणाला की याबद्दल बोलणं खूप घाईचं होईल. मला माहित नाही की आम्ही पाच महिन्यांनंतर कुठे असू, असं गंभीरनं यावेळी नमूद केलं. रोहितला प्लेइंग 11 मधून वगळण्याच्या निर्णयावर बोलताना गंभीर म्हणाला, “प्रत्येकानं संघाच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे आणि रोहितनं तेच केलं.”
हेही वाचा –
वन मॅन आर्मी! या खेळाडूने जिंकला बॉर्डर-गावस्कर मालिकेचा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार
सिडनी कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं जाणून घ्या
भारताचे पानिपत! ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर जिंकली बॉर्डर-गावस्कर मालिका