टी-२० विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसच शिल्लक आहेत. अशात सगळे संघ या स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने तर विश्वचषक स्पर्धेचा आपला १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे. तसेच ही स्पर्धा जसजशी जवळ येत आहे, तसतसे अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेच्या विजेत्या संघाविषयी आपले तर्कवितर्क मांडत आहेत. यातच आता भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने देखील आपले मत मांडले आहे.
अनेक दिग्गजांच्या मते भारत आणि पाकिस्तान हे टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र गंभीरने याबाबत आपले वेगळे मत व्यक्त केले आहे. गंभीरच्या मते भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप मजबूत स्थितीत आहे. मात्र, अफगाणिस्तान संघापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
नुकतेच मंगळवारी (१७ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय नियामक मंडळाने (आयसीसी) टी२० विश्वचषक सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर केले. ज्यात भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत २४ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे गंभीरने या होणाऱ्या सामन्यांविषयी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, “पाकिस्तान संघाकडून देखील खूप अपेक्षा बाळगल्या जाऊ शकतात. मात्र, तुम्ही परिस्थिती पाहिली तर भारत हा पाकिस्तानच्या तुलनेत अधिक मजबूत स्थितीत आहे. तसेच टी-२० स्वरूपचे असे आहे, ज्यामध्ये कोणताही संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो. जास्त करून वैयक्तिक खेळीवर आधारित असलेला असा हा खेळ आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमजोर समजणे येथे चुकीचे ठरू शकते.”
पुढे बोलताना गंभीर म्हणाला, “उदाहरण द्यायचे झाले तर, अफगाणिस्तानचे घेऊ. या स्पर्धेत अफगाणिस्तानला कोणत्याही क्षेत्रात कमी लेखणे हे चुकीचे ठरू शकते. राशिद खानसारखा खेळाडू या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. हीच गोष्ट पाकिस्तानसाठी देखील लागू होते. मात्र पाकिस्तानचा संघ दबावात असणार.”
“तसेच अफगाणिस्तानचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सारख्या स्पर्धेत देखील खेळतात. त्यामुळे ते एक चांगले प्रतिस्पर्धी संघ म्हणून या स्पर्धेत खेळ करू शकतात. त्यामुळे या स्पर्धेत अफगाणिस्तानला कमी लेखून चालणार नाही. अफगाणिस्तानचा संघ सामन्यात कधीही उलटफेर करू शकतो. कारण अफगाणिस्तानकडे राशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी सारखे खेळाडू आहे. ज्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे हा संघ या स्पर्धेत एखाद्या संघाला डोकेदुखी ठरू शकतो,” असेही गंभीर म्हणाला.
तसेच आयसीसीने या स्पर्धेसाठी दोन गट केले आहेत. त्यातील ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. या गटाबाबत बोलताना गंभीर म्हणाला, “तसे पाहायला गेले तर, हाच खरा गट आहे. हे ४ संघ २३ ऑक्टोबरला खेळण्यासाठी मैदानात उतरणार. शनिवारचा तो दिवस अत्यंत कमालीचा असेल.” तसेच ब गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–‘सचिन अन् द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवत कोहली पुढे जातोय,’ विरोधी संघातून कौतुक
–एकच नंबर भावा! चेंडू पकडण्यासाठी दर्शकाची कमालीची कसरत, खुर्चीवरुन खाली पडूनही टिपला झेल
–“विराटने सात वर्षांपूर्वी केलेला नंबर वन बनण्याचा संकल्प”, माजी प्रशिक्षकाने केला खुलासा