भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषकासाठी श्रीलंकेत आहे. शनिवारी (2 सप्टेंबर ) भारतीय संघ पाकिस्तानचे आव्हान स्वीकारत स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळेल. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 सदस्यीय भारतीय संघ पाठवला असून, यामध्ये अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांचा देखील समावेश आहे. मात्र, त्याच्या संघातील जागेवरच आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश केला गेला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा हे समाविष्ट आहेत. यासोबतच अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या व शार्दुल ठाकूर हे देखील मध्यमगती गोलंदाजी करतात. याच संघाबाबत बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या सामन्यादरम्यान चर्चा करताना गंभीर याने मोठे विधान केले. तो म्हणाला,
“भारतीय संघाने आशिया चषकात तीन वेगवान गोलंदाजांसह खेळावे. हार्दिक पंड्या हा देखील एक पर्याय आहे. मात्र, ज्यावेळी तुम्ही शार्दुल ठाकूर याच्याकडे पाहता त्यावेळी तो बिट्स अँड पीस खेळाडू वाटतो. तो नेहमी योगदान देणाऱ्या खेळाडूंपैकी नाही.”
यापूर्वी देखील गंभीरने आशिया चषकाच्या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना ठाकूर याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले. ठाकूर याच्या जागी शिवम दुबे हा योग्य पर्याय होता असे त्याने म्हटलेले.
शार्दुल याच्या कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने वनडे क्रिकेटमध्ये नेहमीच दर्जेदार कामगिरी केली आहे. 2019 वनडे विश्वचषकानंतर त्याने भारतासाठी सर्वाधिक बळी मिळवले आहेत. त्याने आतापर्यंत भारतासाठी 38 वनडे सामने खेळताना 58 बळी मिळवले असून, त्याच्या नावे 315 धावा देखील जमा आहेत. विदेशातील कसोटी मालिकांमध्ये शार्दुल नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतो.
(Gautam Gambhir Said Shardul Thakur Is Bits And Piece Player)
हेही वाचाच-
लंकन सिहांनी शांत केले बांगला टायगर्स! श्रीलंकेची शानदार विजयाने सुरुवात
IPL फायनलमध्ये CSKचा घाम काढणाऱ्या खेळाडूचा मोठा निर्णय, विदेशी संघासोबत केला ‘एवढ्या’ सामन्यांचा करार




