भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि सध्या खासदार असणाऱ्या गौतम गंभीरने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टी२०) यष्टीरक्षण करण्यासाठी एमएस धोनीचा पर्याय म्हणून एका खेळाडूचे नाव सांगितले आहे. हा खेळाडू म्हणजे इतर कोणी नसून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आहे.
मागील वर्षी जुलै २०१९ मध्ये वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) एकदाही चांगले क्रिकेट खेळताना दिसला नाही. धोनी आयपीएल २०२०मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळी बोलताना गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, “धोनीचा योग्य पर्याय म्हणून राहुलची (KL Rahul) निवड केली जाऊ शकतो. कारण राहुलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगल्याप्रकारे यष्टीरक्षणाची आणि फलंदाजीची जबाबदारी सांभाळलेली मी पाहिली आहे.”
गंभीर पुढे म्हणाला की, “कोरोना व्हायरसमुळे यावर्षी आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे (IPL 13th Season) आयोजन झाले नाही, तर ऑक्टोबर टी२० विश्वचषकात धोनीचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे. कारण धोनी मागील अनेक महिन्यांपासून एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही.”
“जर तुम्ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असाल तर, जो खेळाडू चांगली कामगिरी करेल किंवा भारताला विजय मिळवून देईल त्या खेळाडूने संघात खेळले पाहिजे,” असेही गंभीर यावेळी म्हणाला.
राहुलने आतापर्यंत ३२ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४७.६५ च्या सरासरीने १२३९ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये ४५.६५ च्या सरासरीने १४६१ धावा केल्या आहेत. त्यात २ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-धोनीसह भारतीय संघाकडून खेळलेले झारखंडचे ३ खेळाडू
-३ महान क्रिकेटपटू व त्यांचे अपयशी ठरलेले पुत्र
-उपेक्षितांचा हिरो लुटेरु राॅस पोट्युआ लोटे टेलर