मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शुक्रवारपासून (४ मार्च) दोन सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना (1st Test) पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ भक्कम स्थिती आहे. भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात ८५ षटकात ६ बाद ३५७ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळालेल्या हनुमा विहारीने शानदार अर्धशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताचे दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांनी या खेळीबद्दल त्याचे कौतुक केले.
घरच्या मैदानावर आपला दुसरा डाव खेळत असलेल्या हनुमा विहारीने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा मोठ्या सहजतेने सामना केला. विहारीने ९३ चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना ५ चौकार मारले. विहारीने अनेक वर्षांपासून भारतासाठी सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या हनुमाने या संधीचा चांगलाच फायदा घेतला.
भारतीय निवडकर्त्यांनी श्रीलंका मालिकेसाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला वगळल्यानंतर विहारीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. रोहित आणि मयंक बाद झाल्यानंतर कोहलीसह विहारीने डाव चांगल्या प्रकारे सांभाळला.
गावसकरांनी केले कौतुक
तिसऱ्या क्रमांकावर अर्धशतक झळकावताना विहारीने गावसकरांना चेतेश्वर पुजारा ची आठवण करून दिली. ते प्रसारण वाहिनीशी बोलताना म्हणाले,
“त्याने पुजाराप्रमाणे ड्रेसिंग रूममध्ये शांतता निर्माण केली असेल. पुजारा मैदानावर असताना सर्व खेळाडू निवांत असतात. तो एक टोक सांभाळून ठेवायचा. विहारीने केलेल्या धावा अगदी बॅटच्या मधोमध लागून आल्या होत्या. तो अत्यंत प्रभावी दिसत होता. त्याने दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी करून दाखवली होती.”
हा सामना विहारीच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतल शंभरावा सामना होता. त्याने शानदार अर्धशतकासह हा सामना संस्मरणीय केला.
महत्वाच्या बातम्या-