पुणे । प्रदूषणाचे होणारे घातक परिणाम याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये प्रदूषणविरहीत स्वच्छ जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्टारकेन स्पोर्ट्स प्रा. ली आणि रोटरी क्बल ऑफ पिंपरी मिळून सायक्लोथॉनचे आयोजन करणार आहे. हि सायकल रॅली ४ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता निघणार असून प्राधिकरण येथील मेयर हाउस प्लॉट येथून निघून पिंपरी चिंचवड मधील बहुतांश भागातून जाणार आहे. हे सायक्लोथॉन फुल (३०किमी), हाफ (१५ किमी) आणि लहान मुले (५ किमी) या ३ विभागामध्ये होणार आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पिंपरी चिंचवड मधील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे होणार्या वायू प्रदुषणाबद्दल नागरिकांना सतर्क करणे आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. वाढत्या वायू प्रदुषणामुळे कॅन्सर, अस्थमा, त्वचा रोग यांसारखे कितीतरी विकार होऊ शकतात. हि सायक्लोथॉन वाहनांचा वापर कमी करून वायू प्रदूषण कमी करण्यास मदत करणे आणि दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करणे याविषयीचा संदेश देईल. रोटरी क्लब ऑफ पिंपरीने खेड तालुक्यातील खारपूड आणि खोपेवाडी हि २ गावे दत्तक घेतली असून गावातील लोकांचे एकूण आयुष्यमान सुधारणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास रोटरी क्लब त्यांना मदत करत आहे. या सायक्लोथॉनद्वारे रोटरी क्लब कॉर्पोरेट क्षेत्राला सहभागी करून घेऊन निधी उभा करण्याचादेखील प्रयत्न करत आहे जेणेकरून जमा झालेला निधी हा या गावातील लोकांच्या कल्याणाकरता वापरता येईल.
या प्रसंगी बोलताना श्री प्रवीण पाटील, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टारकेन स्पोर्ट्स प्रा ली म्हणाले, “जायंट स्टारकेन तर्फे आम्ही नेहमीच पर्यावरणाशी निगडीत समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सायकलिंग हे त्यासाठी किती योग्य मध्यम आहे हा प्रसार करत असतो. मला आज रोटरी क्लब सोबत या सायक्लोथॉनसाठी भागीदारी करताना अत्यंत आनंद होत आहे. पिंपरी चिंचवडचा अतिशय वेगाने विकास होत असून शहरात विविध वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि वायू प्रदूषण वाढत आहे. या काळात प्रदूषण, वाढती रहदारी यावर मात करण्यासाठी सायकल सारख्या उपयुक्त वाहनाचा वापर वाढवला पाहिजे. त्याच बरोबर या सायक्लोथॉनमुळे रोटरी बरोबर त्यांच्या सामाजिक उपक्रमात देखील आम्हाला सहभागी होता येणार आहे. भविष्यात देखील रोटरी क्लबच्या अश्या उपक्रमांना आम्ही नेहमीच साथ देऊ ज्याद्वारे सायकलिंगचा प्रसार होईल.”
श्री बिमल रावत, अध्यक्ष-रोटरी क्लब पिंपरी म्हणाले, “ जायंट स्टारकेन सोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे कारण हि कंपनी पर्यावरणाशी निगडीत विविध उपक्रमांत सतत हिरीरीने सहभागी असते. या सायक्लोथॉनद्वारे आम्ही वायू प्रदुषणाचे वाढते दुष्परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी सायकलिंग हा कसा उत्तम पर्याय आहे याचा प्रसार करणार आहोत. पुणे एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे आणि आता हीच योग्य वेळ आहे कि आपण परत एकदा सायकलिंगचे वैभव पुण्याला मिळवून देऊ शकतो ज्याद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होईल.”