रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत बिलकुल चांगला राहिलेला नाही. विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात फ्लॉप झाला असला तरी तो संघासाठी सातत्यानं धावा करत आहे. मात्र ग्लेन मॅक्सवेल हा आरसीबीसाठी सर्वात कमकुवत दुवा ठरू लागला आहे.
मॅक्सवेल चालू हंगामात 3, 4 आणि 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, परंतु प्रत्येक वेळी त्याची बॅट शांतच राहिली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, मॅक्सवेलनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 6 डावांमध्ये केवळ 32 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 28 आहे, जी त्यानं केकेआर विरुद्धच्या सामन्यात केली होती. जगभरातील भल्या-भल्या गोलंदाजांना पाणी पाजणारा मॅक्सवेल या हंगामात केवळ 5.3 च्या सरासरीनं धावा करत आहे.
ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या या हंगामात तीन वेळा शून्य धावांवर बाद झाला आहे. आतापर्यंत तो चेन्नई, लखनऊ आणि आता मुंबईविरुद्ध शून्यावर बाद झाला. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतही मॅक्सवेलचा फ्लॉप शो जारी आहे. तो जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. मात्र त्यानं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 3 झेल सोडले आहेत.
मुंबई इंडियन्सविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर मॅक्सवेलच्या नावे एक लाजिरवाणा रेकॉर्ड झाला. तो इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 0 धावांवर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे प्रथम स्थानी आला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेल आपल्या आयपीएल कारकिर्दीत 17व्यांदा शून्यावर बाद झाला. मॅक्सवेलशिवाय रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये 17 वेळा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
आरसीबीसी मधली फळी मॅक्सवेलवर अवलंबून आहे. तो संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. मात्र तो धावा करत नसल्यामुळे संघाची मधली फळी पूर्णपणे निष्फळ ठरत आहे. यामुळे खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या दिनेश कार्तिकवर दबाव वाढतोय. जर मॅक्सवेल वेळीच फॉर्ममध्ये आला नाही, तर आरसीबीसाठी ही मोठी अडचण ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
“याला वर्ल्डकप खेळायचा आहे”, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकची रोहितनं मैदानावरच खेचली!