मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीगच्या तिसर्या सामन्यात जमैका तल्लावझने सेंट लुसिया ज्यूक्सचा एकतर्फी 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणार्या सेंट लुसियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 158 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात जमैकाने केवळ 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
जमैकाच्या विजयाचा नायक पाकिस्तानी फलंदाज असिफ अली होता, त्याने 27 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. या मधल्या फळीतील फलंदाजाने त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 170 पेक्षा जास्त होता. त्याच्या व्यतिरिक्त कीवी फलंदाज ग्लेन फिलिप्सनेही अविश्वसनीय खेळी खेळली. फिलिप्सने 29 चेंडूत 44 धावा केल्या. त्यामुळे जमैकाने 159 धावांचे आव्हान 18.5 षटकात 160 धावा करत सहज पार केले.
सेंट लुसियाकडून रॉव्हस्टन चेसने 42 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. नजीबुल्लाह जादरानने 25 आणि फ्लेचरने 21 धावा केल्या.
जमैकाकडून गोलंदाजीत मुजीब उर रहमानने चमक दाखवली आणि 4 षटकांत 25 धावा देऊन 2 बळी घेतले. तसेच या सामन्यातील सर्वात मोठा खेळाडू मानल्या जाणार्या आंद्रे रसेलने जमैकाकडून गोलंदाजीत १ गडी बाद केला, पण त्याने फलंदाजीत फारशी चुणूक दाखवले नाही. रसेलने 17 चेंडूत 16 धावा केल्या. त्याला केसरिक विल्यम्सने बाद केले.






