गुवाहाटी | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बुधवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे.
नॉर्थईस्टला पहिल्या पाच समन्यांत केवळ चार गुण मिळविता आले आहेत. हा संघ नवव्या स्थानावर आहे. जोओ कार्लोस पिरेस डे डेयूस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या संघाला प्रतिस्पर्ध्याचा बचाव भेदून गोल करणे अवघड जात आहे. आतापर्यंत हा संघ केवळ दोन गोल करू शकला आहे.
दुसरीकडे मुंबईचा संघ येथील इंदिरा गांधी अॅथटेलीक स्टेडियमवर उतरेल तेव्हा त्यांच्यासमोर अशी काही समस्या नसेल. अलेक्झांड्रे गुईमाराएस यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाचा एफसी पुणे सिटीला मागे टाकून गुणतक्त्यात चौथे स्थान मिळविण्याचा निर्धार असेल. मागील सामन्यात एटीकेविरुद्ध त्यांना अनुकूल निकाल साधता आला नाही.
डेयूस यांनी सांगितले की, माझ्या संघाला आणखी गोल करण्याची गरज आहे. कोणते चार संघ आगेकूच करतील हे इतक्यात सांगणे घाईचे ठरेल. आम्ही आतापर्यंत पाच सामने खेळले आहोत. तेवढे सामने झाल्यानंतर कोणताच संघ लिग जिंकत नाही अथवा आव्हानही संपुष्टात येत नाही. ही वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे. गुणतक्त्यात आघाडी घेणारा संघ सुद्धा लिग जिंकतोच असे नाही. अर्थात आम्हाला जास्त सामने जिंकण्याची आणि जास्त गोल करण्याची गरज आहे.
नॉर्थईस्टला पहिल्या पसंतीचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्याला लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्याच्यादृष्टिने यापेक्षा जास्त चिंताजनक बाब म्हणजे डेयूस यांचा त्याच्यावरील विश्वास उडाला असावा असे दिसते.
या लढतीसाठी गोलरक्षक म्हणून कुणाला पसंती देणार, या प्रश्नावर डेयूस म्हणाले की, आम्ही मोसमाची सुरवात केली तेव्हा रेहेनेश पहिले पाच सामने खेळला, याचे कारण प्रशिक्षकांना तो सर्वोत्तम गोलरक्षक आहे असे वाटले. आता प्रशिक्षकांना तो सर्वोत्तम असल्याचे वाटत नाही. आता रवीकुमार सर्वोत्तम असल्याचे मला वाटते.
मुंबईला मध्य फळीतील सेहनाज सिंग याच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. त्याला मोसमातील चौथ्या पिवळ्या कार्डला सामोरे जावे लागले. २४ वर्षांच्या या खेळाडूवर एका सामन्याची बंदी आली आहे.
त्याच्या जागी कोण खेळणार हे सांगण्यास मात्र गुईमाराएस यांनी नकार दिला. रात्र मोठी आहे. मला याविषयी अजून विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईचा मागील सामना तीन दिवसांपूर्वीच झाला. त्यानंतर त्यांना लांबचा प्रवास करावा लागला. याविषयी कोस्टारीकाचे गुईमाराएस म्हणाले की, ही स्पर्धा खडतर आहे. रविवारीच आम्ही सामना खेळलो. त्यानंतर या सामन्यासाठी आम्हाला लगेच प्रवास करावा लागला. अर्थात असे वेळापत्रक सर्वच संघांसाठी आहे. आमच्या संघाने येथील मैदानावर खेळावे म्हणून मी उत्सुक आहे. हे लिगमधील एक सर्वोत्तम मैदान आहे.