सध्या जगभरात अनेक देशांमध्ये टी20 क्रिकेट लीग खेळल्या जात आहेत. टी20 क्रिकेटचा अतिरेक होत असल्याची टीका अनेक माजी क्रिकेटपटू करतात. आता यामध्ये वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू गॉर्डन ग्रिनिज यांचा देखील समावेश झाला आहे. त्यांनी टी20 क्रिकेटवर टीका करत टी20 क्रिकेट हे खेळाडूंसाठी नव्हे तर केवळ प्रेक्षकांसाठी असल्याचे म्हटले. तसेच, कसोटी क्रिकेट टिकणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रिनिज हे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्ली येथे पोहोचले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी क्रिकेटच्या भवितव्याविषयी आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले,
“मी वनडे क्रिकेट समाप्त होताना पाहू इच्छित नाही. केवळ टी20 क्रिकेटच असावे असे मला कदापिही वाटत नाही. टी20 क्रिकेट हे खेळाडूंसाठी नसून केवळ प्रेक्षकांसाठी आहे. टी20 क्रिकेट मला फास्ट फूड सारखे वाटते. या सर्वांमध्ये कसोटी क्रिकेट टिकणे गरजेचे आहे. हे तेच क्रिकेट आहे ज्यामुळे आपण सर्वजण पुढे आलो आहोत.”
ग्रिनिज यांनी पुढे म्हटले,
“सध्या मी जास्त क्रिकेट पाहत नाही. केवळ कधीतरी कसोटी क्रिकेटच पाहतो. काही युवा खेळाडू येऊन सल्ला मागतात त्यावेळी तो त्यांना देत असतो.”
सध्या जगभरात अनेक टी20 लीग खेळल्या जातात. भारतात आयपीएल, ऑस्ट्रेलिया बिग बॅश, वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग तसेच पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग अनेक वर्षांपासून खेळली जाते. तसेच, मागील काही वर्षात श्रीलंका व बांगलादेश यांनी देखील आपल्या लीग सुरू केल्या आहेत. तसेच यावर्षीच दक्षिण आफ्रिकेत आणि युएईमध्ये नव्या लीग सुरू झाल्या असून, त्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
(Gordon Greenidge Said T20 Cricket Is Fast Food Cricket)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे वादळी शतक, विक्रम मोडणे विराट कोहलीसाठीही अशक्य
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध






