पुणे । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शनिवारी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एफसी पुणे सिटीची नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. घरच्या मैदानावर पुण्याला फॉर्मसाठी झगडावे लागत आहे. त्यातच मुख्य प्रशिक्षक रॅंको पोपोविच यांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतरही पुण्याला फॉर्म गवसण्याची आशा आहे.
चौथ्या मोसमात धडाकेबाज प्रारंभ केलेल्या एफसी गोवाविरुद्ध पुण्याने त्यांच्याच मैदानावर शानदार विजय संपादन केला. चिवट बचाव वैशिष्ट्य असलेल्या जमशेदपूर एफसीला त्यांच्याच मैदानावर हरविण्यातही पुण्याने यश मिळविले. असे असले तरी घरच्या मैदानावर पुण्याला चार पैकी तीन सामने गमवावे लागले आहेत.
आता पुण्याची नॉर्थईस्टशी लढत होत आहे. हा संघ गुणतक्त्यात खालच्या नवव्या स्थानावर आहे. त्यांच्याविरुद्ध पुण्याला प्रशिक्षक पोपोविच यांची उणीव जाणवेल. सर्बियाच्या पोपोवीच यांना शीस्तभंगाबद्दल चार सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. गोव्यातील सामन्यानंतर पंचांशी गैरवर्तनामुळे त्यांनी 50व्या कलमाचा, तर आक्रमक वर्तनामुळे 58व्या कलमाचा भंग केला. त्यामुळे ही कारवाई झाली.
त्यांची उणीव भासणे अटळ असले तरी सहाय्यक प्रशिक्षक व्लादिचा ग्रुजीच यांच्यासमोर आणखी मोठे आव्हान आहे. बाहेरच्या मैदानावरील कामगिरीची घरच्या मैदानावर पुनरावृत्ती करण्याचा मार्ग त्यांना शोधावा लागेल.
ग्रुजीच म्हणाले की, आम्ही घरच्या मैदानावर दोन सामने गमावले असले तरी नशिबाची थोडीशी साथ मिळाल्यास आम्ही जिंकू शकलो असतो हे प्रत्येकाला ठाऊक आहे. संघ चांगला खेळ करतो आहे. आम्ही सामन्यागणिक सरस खेळ केला आहे. पूर्वी काय घडले याचा विचार आम्ही करण्याची गरज नाही.
नॉर्थईस्टला सहा सामन्यांतून केवळ चार गुण मिळविता आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पुण्याला चांगली संधी वाटते. असे असले तरी गुणतक्त्यातील आकड्यांच्या तुलनेत नॉर्थईस्टचा संघ कितीतरी सरस असल्याचा इशारा ग्रुजीच यांनी दिला. ते म्हणाले की, त्यांचे सामने पाहिले तर त्यांचे गुण आणखी जास्त असले असते असे तुम्हाला जाणवेल. त्यांचा संघ चांगला खेळ करतो. आम्ही शनिवारी भक्कम प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळत असू.
ग्रुजीच यांचे वक्तव्य नॉर्थईस्टचे प्रशिक्षक जोओ डे डेयूस यांच्यासाठी आनंददायक आहे. त्यांच्या संघाला अधूनमधून चांगली कामगिरी करता आली, पण त्यांना सलग तीन पराभव पत्करावे लागले आहेत.
पोर्तुगालचे डेयूस म्हणाले की, आमचे सामने पाहिल्यास संघ संघटित असल्याचे दिसेल. हा संघ चांगला बचाव करणारा आहे. चेन्नईत मला आजारी खेळाडू खेळवावा लागला. तेथे आम्हाला तीन गोल पत्करावे लागले. हा सामना वगळल्यास आमच्याविरुद्ध गोल करणे अवघड आहे. तुम्ही गोल केला तर तो आम्ही दिलेला बोनस असतो.
डेयूस आतापर्यंत राखलेले संघाचे स्वरूप आणि धोरणांत फारसा बदल करण्याची शक्यता नाही, पण प्रतिस्पर्ध्यांना बोनस देऊन चालणार नाही असे त्यांनी संघाला बजावले.