क्रिकेटच्या खेळात अष्टपैलू खेळाडूंचं मोठं महत्व असतं. ते सामन्याची दिशा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अष्टपैलू खेळाडूंना गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही प्रसंगी दबावाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत सातत्यानं चांगली कामगिरी करणं कोणत्याही अष्टपैलू खेळाडूसाठी सोपं नसतं.
नुकताच नेपाळचा अष्टपैलू खेळाडू गुलशन झा हा एकाच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी घेणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा 3 सर्वात तरुण खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम केलाय.
(3) शाहिद आफ्रिदी – या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2000 मध्ये इंग्लंडनं पाकिस्तानचा दौरा केला होता. दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना लाहोरमध्ये खेळला गेला. या सामन्यात आफ्रिदीनं जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजी करताना त्यानं 69 धावांची शानदार खेळी केली. तर गोलंदाजी करताना त्यानं 40 धावांत 5 बळी घेतले. शाहिद आफ्रिदीचं वय तेव्हा 20 वर्ष 240 दिवस एवढं होतं. पाकिस्ताननं हा सामना 8 विकेटनं जिंकला.
(2) अब्दुल रज्जाक – 2000 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात होबार्टमध्ये एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 262/7 धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानच्या अब्दुल रझाकनं दमदार फलंदाजी करत 52 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. त्याचबरोबर त्यानं गोलंदाजीत 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याच्या या धोकादायक गोलंदाजीमुळे टीम इंडिया 46.5 षटकात 230 धावांवर ऑलआऊट झाली. त्यावेळी रज्जाकचं वय 20 वर्ष 50 दिवस होतं.
(1) गुलशन झा – सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 चे सामने आयोजित केले जात आहेत. स्पर्धेच्या 28व्या सामन्यात नेपाळचा सामना ओमानशी झाला. या सामन्यात नेपाळचा अष्टपैलू गुलशन झा यानं 35 चेंडूत 53 धावांची अर्धशतकी खेळी खेळली आणि गोलंदाजीत 47 धावांत 5 बळी घेतले. यावेळी गुलशन झाचं वय 18 वर्ष 214 दिवस आहे. मात्र, त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही नेपाळला सामन्यात 1 गडी राखून पराभव पत्कारावा लागला.
हेही वाचा –
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवशी वाद, रिषभ पंत लिटन दासशी भिडला; जाणून घ्या प्रकरण
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच सत्रात भारताचं कंबरडं मोडणारा हसन मेहमूद कोण आहे?
चेन्नईत असं का केलं?, रोहितच्या या निर्णयानं चाहते हैराण!